google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक..काळविटाच्या मांसासह शिकारीचे साहित्य जप्त; सांगोला तालुक्यात वनविभागाची कारवाई..

Breaking News

खळबळजनक..काळविटाच्या मांसासह शिकारीचे साहित्य जप्त; सांगोला तालुक्यात वनविभागाची कारवाई..

खळबळजनक..काळविटाच्या मांसासह शिकारीचे साहित्य जप्त; सांगोला तालुक्यात वनविभागाची कारवाई..


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला : वन्यप्राण्यांची शिकार करण्यास बंदी असताना सांगोला वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या पथकाने आलेगाव (ता. सांगोला) येथे धडक कारवाई करत

 एका व्यक्तीच्या घरातून काळवीटाचे सुमारे ६.८८० किलो मांस व शिकारीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले.ही कारवाई शुक्रवार (ता. १२) रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

या प्रकरणी नितीन मवाली शिंदे (वय २८, रा. आलेगाव, ता. सांगोला) याच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सागर मगर यांनी दिली.

आलेगाव परिसरात काळवीट (हरिण) प्राण्याची शिकार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी सागर मगर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल जे. जे. खोंदे, वनरक्षक प्रतिभा जलदावार, 

के. एन. जगताप, इंगोले, वाघमोडे, मुंढे तसेच वनमजुरांच्या पथकाने संशयिताच्या घराची झडती घेतली. यावेळी प्राथमिक अंदाजानुसार काळविटाचे ६.८८० किलो मांस आढळून आले.

तसेच शिकारीसाठी वापरण्यात येणारे दोन लाकडी पिंजरे, सहा नायलॉन दोरी-जाळ्या, एक लोखंडी सत्तूर, एक लाकडी ठोकळा, एक लोखंडी सुरी, तीन प्लास्टिक पिशव्या व दोन स्टील पाट्या असे साहित्यही जप्त करण्यात आले.

जप्त केलेले वन्यप्राणी मांस पशुधन विकास अधिकारी वर्ग (अ), वाकी-घेरडी यांच्यामार्फत सीलबंद करण्यात आले असून पुढील तपासणीसाठी ते फॉरेन्सिक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणार आहे.

 या कारवाईसाठी पोलिस उपनिरीक्षक संजय राऊत, पोलिस हवालदार जमीर शेख व पोलिस पाटील दिलीप पाटील यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments