सोलापूरकरांनो, लक्षात ठेवाच! मंगळवेढ्याकडे जाणारा 'हा' रस्ता १ वर्षासाठी बंद; त्या रोडवरील वाहनांसाठी 'हे' ४ पर्यायी रस्ते, १४ डिसेंबरला पडणार रेल्वेचा पूल
सोलापूर : येथील सोलापूर शहरातील भय्या चौक (लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक) ते मरिआई चौक या रोडवरील रेल्वेचा जीर्ण झालेला
पूल १४ डिसेंबरला पाडला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता.९) रात्री १२ पासून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे.
९ डिसेंबर २०२५ ते ८ डिसेंबर २०२६ पर्यंत या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली जाईल, असा आदेश पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी काढला आहे.
सोलापूर शहरातून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून मरिआई चौकाकडे जाताना १९२२ मध्ये बांधलेला रेल्वेचा जुना पूल आहे. त्यावेळी मंगळवेढा ते पंढरपूर आणि कोल्हापूरसह अन्य शहरांना जोडण्यासाठी पूल बांधला होता.
१०३ वर्षे जुना पूल सध्या वाहतुकीसाठी धोकादायक, असुरक्षित झाला आहे. त्यामुळे १४ डिसेंबर रोजी तो पाडण्यात येणार आहे. त्यासाठी आधुनिक हायड्रॉलिक ब्रेकर, काँक्रिट क्रशर आणि कटिंग मशिन वापरून हा पूल तोडला जाणार आहे.
त्यामुळे या मार्गावरील पूर्ण वाहतूक दुसरीकडून वळविली आहे. सुरवातीला काही दिवस पर्यायी मार्गावर सोलापूर शहर पोलिसांचे अंमलदार वाहतूक नियमन करणार आहेत.
वाहनांसाठी 'हे' पर्यायी मार्ग
मरिआई चौक ते एसटी स्टॅण्ड रोड : या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी मरिआई चौक- शेटे नगर रेल्वे बोगदा- खमीतकर अपार्टमेंट, एमएसईबी ऑफिस- निराळे वस्ती- छत्रपती शिवाजी महाराज चौक ते एसटी स्टॅण्ड.
मरिआई चौक ते रेल्वे स्टेशन रोड : मरिआई चौक- नागोबा मंदिर- रामवाडी पोलिस चौकी- रामवाडी दवाखाना- रामवाडी ग्रीन गोडाऊन- मोदी बोगदा- जांबमुनी चौक- मोदी चौकी- कुमार चौक ते रेल्वे स्टेशन.
मंगळवेढा रोड : मंगळवेढ्याहून हैदराबाद, तुळजापूर, विजयपूर, पुण्याकडे जाणाऱ्या वाहनधारकांना व या रोडने मंगळवेढ्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांना नवीन विजापूर रोड ते केगाव बायपासचा वापर करता येईल.
देगाव व दमाणी नगर : येथील रहिवाशांना सोलापूर शहरात ये-जा करण्यासाठी जगताप हॉस्पिटल- सीएनएस हॉस्पिटल-
जानकर नगर- नवीन रेल्वे बोगदा- अभिमानश्री नगर- अरविंदधाम वसाहत- जुना पूना नाका ते इच्छितस्थळी जाता येईल.


0 Comments