चोपडी जि. प. गटाकरिता ग्रामस्थ योग्य उमेदवाराच्या शोधत..!
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
# भूखंडाचे श्रीखंड करणारा, वाळू माफिया, दलाल, सावकार की निष्कलंक प्रशासनाचा अनुभव असलेला लोकप्रतिनिधी ?
चोपडी. (प्रतिनिधी) – आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चोपडी जिल्हा परिषद गटात
केवळ राजकीय हालचालीच नव्हे तर लोकांचा रोष देखील तीव्र होत चालल्याचे चित्र आहे.
तसेच, “नेमका कसा उमेदवार हवा?” हा प्रश्न गावागावातील चौक, चावडी, चहाचे कट्टे आणि शेतशिवारात जोरकसपणे चर्चिला जात आहे.
‘विकास’ की ‘व्यवसाय’? जनतेचा थेट सवाल
गेल्या काही वर्षांत विकासाच्या घोषणा मोठ्या झाल्या, फलक झळकले, उद्घाटनं झाली;
मात्र रस्ते, पाणी, आरोग्य, शाळा आणि रोजगार यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर
अपेक्षित बदल दिसत नसल्याची तीव्र नाराजी जनतेत आहे. “आम्हाला प्रतिनिधी हवा, मालक नको” ही भावना सध्या गावोगावच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.
भूखंडांचे श्रीखंड करणारा, रात्रीअपरात्री गावालगतच्या नदीतून बेकायदेशीर वाळू उपसणारा म्हणजेच वाळू माफिया आणि हाच व्यक्ती सकाळी गावात
पुढारी पण करणारा नेता, दलालगिरी करणारा किंवा गरजू शेतकरी-कष्टकऱ्यांना व्याजाच्या विळख्यात अडकवणारा सावकार अशा प्रवृत्तीच्या
लोकप्रतिनिधींना आता जनतेने स्पष्टपणे नकार दिल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र, विविध पक्षातून असेच इच्छुक उमेदवार असल्याचे आढळले आहे.
गेल्या अनेक वर्षांत सत्तेचा गैरवापर करून स्वतःची तिजोरी भरणारे, विकासाच्या नावाखाली
केवळ कागदी घोडे नाचवणारे आणि निवडणूक आली की गावात फिरकणारे उमेदवार चोपडी गटातील जनतेला आता नकोसे झाले आहेत.
“आम्हाला विकास हवा, दलाली नको”, “काम करणारा प्रतिनिधी हवा, फक्त भाषणबाजी नको” अशा भावना उघडपणे व्यक्त केल्या जात आहेत.
स्वच्छ चारित्र्य आणि प्रशासनाचा अनुभव असलेला उमेदवार हवा असे चोपडी गटातील जनतेची अपेक्षा स्पष्ट आहे. उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो,
सत्ताधारी असो किंवा विरोधी मात्र तो स्वच्छ चारित्र्याचा, निष्कलंक प्रतिमेचा, गोरगरीबांच्या सुख-दुःखात प्रत्यक्ष सहभागी होणारा हवा, अशी ठाम भूमिका ग्रामस्थ मांडत आहेत.
विशेषतः शासकीय कामकाजाचा अनुभव असलेला, नियम-कायद्यांची जाण असलेला आणि निधी योग्य पद्धतीने विकासासाठी वापरण्याची क्षमता असलेला
व्यक्तीच लोकप्रतिनिधी व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. उदनवाडी, राजुरी, अनकढाळ, मानेगांव,
हणमंतगांव, पाचेगांव ( खु. ), निजामपूर, लोणविरे, चोपडी, बलवडी, नाझरे, सोमेवाडी, बुद्धेहाळ या 13 गावांचा समावेश चोपटी जिल्हा परिषद गटात आहे.
गेल्या काही वर्षांत ‘विकास’ या शब्दाचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला;
मात्र प्रत्यक्षात सामान्य ग्रामस्थांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याची नाराजी दिसून येत आहे. रस्ते, पाणी,
आरोग्य, शिक्षण यांसारख्या विषयांवर ठोस काम करणाऱ्या प्रतिनिधींची कमतरता जाणवत असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
यावेळी पैशाच्या बळावर वातावरण तयार करण्याच्या प्रयत्नांकडेही ग्रामस्थ संशयाच्या नजरेने पाहत आहेत.
“पैसा येतो आणि जातो, पण प्रश्न तसेच राहतात” असा अनुभव बोलून दाखवला जात आहे.
त्यामुळे मतदान करताना आर्थिक आमिषांना बळी न पडता विचारपूर्वक निर्णय घेण्याचा सूर चोपडी गटात दिसून येत आहे. त्याचबरोबर निवडणुकीत
पैशाच्या जोरावर मतं विकत घेण्याचे प्रकार चालणार नाहीत, असा इशाराही मतदारांकडून दिला जात आहे. “पाच वर्षे गायब राहणाऱ्यांपेक्षा
रोज भेटणारा, फोन उचलणारा आणि कामासाठी पाठपुरावा करणारा प्रतिनिधी आम्हाला हवा”, असे मत अनेक ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
चोपडी जि. प. गटातील मतदार यावेळी जात-पात, पक्ष-झेंडे बाजूला ठेवून उमेदवाराचे चारित्र्य, कामाची पार्श्वभूमी आणि जनतेशी असलेले नाते यावर निर्णय घेतील,
असा सूर जनमानसात दिसून येत आहे. एकूणच, वाळू माफिया, दलाल आणि सावकार प्रवृत्तीला रोखून धरत
प्रामाणिक, संवेदनशील आणि विकासाभिमुख उमेदवाराला संधी देण्याचा निर्धार चोपडी गटातील जनता करत असल्याचे स्पष्ट होत आहे.
सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना नकार आणि प्रामाणिक, जबाबदार प्रतिनिधीला संधी
हाच संदेश यावेळी मतपेटीतून दिला जाणार, असा ठाम विश्वास अनेक मतदार व्यक्त करत आहेत. कट्ट्यावर चर्चा, मतदानातून निकाल
सध्या जरी चोपडी गटातील चौकाचौकात, चहाच्या टपऱ्यांवर आणि शेतशिवारात जोरदार चर्चा सुरू असली, तरी या चर्चेचे अंतिम रूप मतदानाच्या दिवशी समोर येणार आहे.
चौकट :-
यावेळी पैशाच्या जोरावर वातावरण तयार करण्याच्या हालचालींवरही ग्रामस्थ बारकाईने नजर ठेवून आहेत. “पाचशे-हजार रुपयांनी पाच वर्षांचा हिशोब चुकता होत
नाही” अशी जाणीव जनतेत दिसून येत आहे. मतदान हे सौदेबाजीचे साधन नसून बदलाचे हत्यार आहे,
याची जाणीव यावेळी मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे जाणकार सांगतात.




0 Comments