खळबळजनक..चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; महूद ते महिम रस्त्यावर धडक, दिवाळीचा बाजार राहिला दुकानातच..
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
महूद: चारचाकी आणि दुचाकी यांची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात महिम (ता. सांगोला)
येथील तेजस संभाजी चौगुले या दुचाकीवरील युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्या मागे बसलेला दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे.
हा अपघात महूद ते महिम रस्त्यावर सोमवारी (ता. २०) सकाळी अकराच्या सुमारास झाला.
महिम येथील तेजस चौगुले (वय ३५) व त्याचा गावातील मित्र दत्तात्रय कांबळे हे दोघे कामानिमित्त दुचाकीवरून महूद येथे आले होते.
महूद येथील काम आटोपल्यानंतर ते दोघे दुचाकीवरून (एमएच ४५- बीए ४१०७) भरधाव वेगाने महिमकडे निघाले होते. त्याच वेळी महिमहून महूद मार्गे पुढे जाणारी चारचाकी (एमएच १०- बीए ६८३८) ही येत होती.
महूद ते महिम मार्गावर असलेल्या पाची डेरा या परिसरातील वळणावर या दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक झाल्यानंतर तेजस चौगुले याचे डोके चारचाकीच्या काचेवर जोरदार आपटले गेले.
त्यामुळे कवटी फुटून आणि चेहऱ्यावरील इतर अवयव बाहेर पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दत्तात्रय कांबळे हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर चारचाकीमधील प्रवाशांनी मागून येणाऱ्या टमटम वाहनाला थांबवून त्यामध्ये या दोघांना घेऊन पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.
त्यानंतर या अपघातग्रस्त चारचाकीमधील प्रवासी रुग्णालयातून अचानक निघून गेले. घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.
दिवाळीचा बाजार राहिला दुकानातच
अपघातात मृत्युमुखी पडलेला तेजस हा शेती करत होता. त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुले व दोन भाऊ असा परिवार आहे.
त्याने दिवाळीसाठी लागणारा बाजार महिम येथील दुकानातच केला होता. त्यापैकी काही सामान घरी ठेवून तो महूद येथे निघाला असताना, दुकानदाराने सामान घेऊन घरी जाण्याबाबत विनंती केली होती;
मात्र 'आम्ही लगेच महूदला जाऊन येतो आणि पुन्हा सामान घेऊन जातो' असे सांगून ते बाहेर पडले होते. त्यानंतर काही वेळातच हा अपघात होऊन त्यामध्ये तेजस मृत्युमुखी पडला. त्याच्यावर सायंकाळी उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.


0 Comments