खळबळजनक..सांगोला तालुक्यातील काही खासगी हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर औषध विक्री – रुग्णांच्या आरोग्याला धोका!
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला / करण मोरे : सांगोला तालुक्यातील काही खासगी हॉस्पिटलमध्ये परवानगीशिवाय औषध व गोळ्यांची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
आरोग्य विभागाच्या नियमांनुसार औषध विक्रीसाठी परवाना, नोंदणीकृत व प्रशिक्षित औषध विक्रेते असणे अनिवार्य आहे. परंतु या नियमांची पायमल्ली करून थेट हॉस्पिटलमधून औषध विक्री सुरू असल्याचे समोर आले आहे.
यामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, रुग्णांच्या जीवाशी थेट खेळ केला जात असल्याचे स्पष्ट होत आहे. परवानाधारक औषध विक्रेत्याऐवजी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांशिवाय औषधे रुग्णांना देण्यात येत
असल्याने चुकीच्या औषधोपचाराचा धोका वाढला आहे. याचा परिणाम म्हणून रुग्णांवर गंभीर दुष्परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेली ही औषध विक्री केवळ कायद्याचे उल्लंघन नसून, वैद्यकीय व्यवसायाच्या नैतिकतेलाही तडा देणारी आहे. याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट असून, त्यांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
आरोग्य विभाग व अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. यामुळे भविष्यात रुग्णांच्या आरोग्याशी होणारा धोका टाळता येईल, असे मत व्यक्त होत आहे.
सांगोल्यातील ही घटना पुन्हा एकदा खासगी हॉस्पिटलच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.


0 Comments