खळबळजनक! पत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात दाखल;
सोलापुरात घडली घटना; पती वकील, मंगळवेढ्यातील असल्याची माहिती
सोलापूर शहरातील वसंत विहार येथील स्वराज विहार भागात आज शुक्रवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली.
घरगुती वादातून वकील असलेल्या पतीने आपल्या पत्नीचा धारदार चाकूने गळा चिरून खून केला. या घटनेनंतर आरोपी पतीने स्वतः फौजदार चावडी पोलिस ठाण्यात हजेरी लावत गुन्ह्याची कबुली दिली.
खून झालेल्या महिलेचं नाव भाग्यश्री प्रशांत राजहंस (वय ३४, रा. स्वराज विहार, वसंत विहारजवळ, सोलापूर) असून आरोपी पतीचे नाव प्रशांत रवींद्र राजहंस (वय ४४ मूळ मंगळवेढा) आहे, जो व्यवसायाने वकील आहे.
भाग्यश्री आणि प्रशांत यांचा विवाह लॉकडाऊन काळात, २०२१ मध्ये झाला होता. विवाहानंतर ते काही काळ मंगळवेढा येथे राहत होते.
सततच्या किरकोळ वादांमुळे नातेवाईकांनी त्यांना सोलापुरात स्थायिक होण्याचा सल्ला दिला होता. गेल्या सहा महिन्यांपासून दोघं स्वराज विहारमध्ये भाड्याच्या घरात राहत होते.
आज सकाळी भाग्यश्रीने आपल्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर एक प्रेरणादायी ‘गुड मॉर्निंग’ मेसेज पाठवला. मात्र,
काही वेळातच नवरा-बायकोमध्ये पुन्हा वाद झाला आणि रागाच्या भरात प्रशांतने धारदार चाकूने भाग्यश्रीच्या मानेवर आणि गळ्यावर वार करून तिचा खून केला.
पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण
खून केल्यानंतर आरोपी प्रशांत राजहंस स्वतः फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गेला आणि घडलेली घटना सांगून खुनाची कबुली दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राऊत यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली असता,
भाग्यश्री गंभीर जखमी अवस्थेत बेडरूममध्ये आढळली. तिला तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, परंतु उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांचा आक्रोश
घटनेची माहिती मिळताच भाग्यश्रीच्या नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली. महिलांचा आक्रोश आणि हंबरडा यामुळे वातावरण गहिवरून गेलं होतं.
पोलिस ठाण्याबाहेर बंदोबस्त
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला. भाग्यश्रीचे नातेवाईक आरोपीला ताब्यात देण्याची मागणी करत पोलिस ठाण्यासमोर जमले होते.
मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही. या प्रकरणाचा पुढील तपास फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे सपोनि अजित पाटील हे करत आहेत.
0 Comments