मोठी बातमी..दारू महागली, अनेकांनी बदलला ब्रॅंड! तरूण आता हातभट्टीच्या नादी,
सोलापूर जिल्ह्यात दिवस-रात्र हातभट्ट्या सुरू; बनावट दारूचीही निर्मिती
सोलापूर : गावात गेला की हातभट्टी कोठे मिळते, याची माहिती गावातील लोकच देतात. हातभट्टी पिऊन काहीजण गावाच्या वेशीत पडलेले
नेहमीच दिसतात. तरुणांच्या भविष्यासाठी गावागावांतील महिलांनी पोलिसांना दारूबंदीसाठी निवेदने दिली, तरीपण गावांमध्ये खुलेआम हातभट्टी विक्री सुरू आहे.
आता देशी-विदेशी दारू महागल्याने सोलापूर जिल्ह्यात रात्रंदिवस हातभट्टीची निर्मिती सुरू असून ती गावागावांत सहजपणे पोच केली जात आहे. दुसरीकडे सोलापूर शहर हद्दीत विषारी ताडीची खुलेआम विक्री सुरू आहे.
राज्य सरकारने देशी-विदेशी दारूवरील टॅक्स वाढविला आहे. त्यामुळे आता १८० मिलिलिटर देशी दारूची बाटली ८० रुपये, मेड लिकर १४८ रुपये, भारतीय बनावटीची विदेशी
दारू २०५ रुपये आणि विदेशी मद्याचे प्रीमिअम ब्रॅंड ३६० रुपयास झाली आहे. त्यामुळे अनेकजण देशी-विदेशी दारूऐवजी हातभट्टी किंवा विषारी ताडीकडे वळत आहेत.
पोलिसांकडील माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यात ५४ ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हातभट्टीची निर्मिती होते. सध्या देशी-विदेशी दारूचे दर वाढल्याने त्या हातभट्ट्या दिवस-रात्र पेटलेल्या दिसत आहेत.
महागडी दारू पिणे परवडत नसल्याने अनेकांनी ब्रॅंड बदलला आहे. याकडे पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने वेळेत लक्ष न दिल्यास भविष्यात गावागावातील तरुण हातभट्टीच्या आहारी जातील आणि मृत्यूचे प्रमाण वाढेल, अशी भीती वर्तविली जात आहे.
सोलापूर जिल्ह्यात बनावट दारू निर्मिती
अकलूज (ता. माळशिरस) व चौभेपिंपरी (ता. माढा) येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बनावट मद्य निर्मितीच्या कारखान्यांवर धाडी टाकून ३० लिटर स्पिरीट, गोवा राज्यनिर्मित १५३ लिटर विदेशी मद्य, ८९ लिटर बनावट
विदेशी मद्य, विदेशी मद्याचे तेराशे बनावट लेबल, दीड हजार बूच, रिकाम्या बाटल्या तसेच बाटल्या सील करण्याचे दोन सीलिंग मशिन जप्त केले. या प्रकरणी तिघांवर कारवाई करण्यात आली आहे.
जीवघेणी हातभट्टी अन् ताडीची खुलेआम विक्री
राज्य उत्पादन शुल्क विभागाने (एक्साईज) १ ते २४ जुलै या कालावधीत सोलापूर शहर व जिल्ह्यातील हातभट्टी निर्मिती केंद्रावर व अवैध देशी-विदेशी मद्य विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली. त्यात ५८ हजार लिटर गूळमिश्रित रसायन,
तीन हजार ८९४ लिटर हातभट्टी, साडेआठशे लिटर देशी-विदेशी मद्य, ७९८ लिटर ताडी जप्त केली आहे. २४ दिवसांतील कारवाईत 'एक्साईज'च्या पथकांनी ६६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दुसरीकडे ग्रामीण पोलिसांच्या कारवाईत मात्र सातत्य दिसत नाही आणि सोलापूर शहर पोलिसांना तर शहरातील ताडी, हातभट्टी विक्री अद्याप दिसलेलीच नाही हे विशेष.
0 Comments