खळबळजनक घटना.. वयोवृद्धाच्या घरातून ८.७५ लाखांचा ऐवज लंपास: सांगाेला पोलिसांत नाेंद, उपचारासाठी मुंबईला गेल्या अन्..
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : पाचेगाव बु. (ता. सांगोला) येथे वयोवृद्धाच्या घरात घरफोडी करून तब्बल ८ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना
गुरुवारी रात्री ११ ते शुक्रवारी (ता. १८) पहाटे दोनच्या दरम्यान घडली.या प्रकरणी सीताराम बाबू बिले (रा. पाचेगाव ब्रु., ता. सांगोला) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
सीताराम बिले (वय ७६, सेवानिवृत्त नेव्ही अधिकारी) हे पाचेगाव बु. येथे राहतात. त्यांच्या पत्नी सावित्रीबाई बिले या उपचारासाठी दोन महिन्यांपूर्वी मुंबईला गेल्या होत्या.
सीताराम बिले हे घरात एकटे राहात होते. १७ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता उकाड्यामुळे पोर्चमध्ये झोपल्यानंतर रात्री दोन वाजता लघुशंकेसाठी उठले असता,
त्यांनी घराच्या गेटची कडी उघडी असल्याचे पाहिले. सकाळी ५.३० वाजता उठून घरात गेले असता, बेडरूमचा दरवाजे उघडा व आतील कपाटे अस्ताव्यस्त दिसली.
अज्ञात चोरट्यांनी घरात शिरून चाव्यांच्या बॉक्समधून कपाटाच्या चाव्या घेऊन पत्र्याच्या पेटीतील रोख रक्कम ४ लाख ५० हजार व दोन सोन्याच्या बांगड्या (५ तोळे),
सोन्याचे गंठण (५ तोळे), लक्ष्मी हार (३ तोळे), बोरमाळ, मण्यांचा हार, फुले झुबे, अंगठी (प्रत्येकी १ तोळा)
असा एकूण ८ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस पाटील, श्वान पथक व फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास सांगोला पोलिस करीत आहेत.
0 Comments