मोठी बातमी..दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आवश्यक असलेले दाखले
व कागदपत्र वेळेत व सहजपणे मिळणार; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची योजना -
यंदाच्या शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी दहावी व बारावीची परीक्षा दिली आहे, त्यांना पुढील शिक्षणासाठी आवश्यक असलेले दाखले व कागदपत्र वेळेत व सहजपणे मिळणार आहेत.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात यावर्षी विशेष कॅम्प घेतले जाणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी महसूल प्रशासनाने केलेल्या या नियोजनामुळे विद्यार्थी व पालक यांची मोठी धावपळ वाचणार आहे.
जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, या कॅम्पच्या नियोजनासाठी जिल्ह्यातील शाळांमधील मुख्याध्यापक व प्राचार्य, जिल्ह्यातील तहसीलदार यांची आम्ही बैठक आयोजित करत आहोत.
त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील महा ई-सेवा केंद्र चालकांची बैठक घेतली जाणार आहे. विशेष कॅम्पमध्ये आलेले प्रस्ताव महा ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून अपलोड केले जाणार आहेत. त्यानंतर हे प्रस्ताव मंजूर केले जाणार आहेत.
शैक्षणिक विद्यार्थ्यांना विविध प्रवेशासाठी प्रमाणपत्र काढण्यासाठी बहुतांश पालक व विद्यार्थी शेवटच्या टप्प्यात पुढे येतात. त्यामुळे तहसील कार्यालय पातळीवर, महा ई-सेवा केंद्राच्या ठिकाणी विद्यार्थी व पालकांची मोठी गर्दी होते.
वेळेत दाखले न मिळाल्यास शैक्षणिक नुकसान होण्याचीही शक्यता असते. हे सर्व धोके टाळण्यासाठी या वर्षी जिल्ह्यात ठिकठिकाणी विशेष कॅम्प वेळेत घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थी व पालक यांच्यासाठी आम्ही या उपक्रमाचे नियोजन केले आहे. या उपक्रमामुळे कामात सुटसुटीतपणा येईल, यंत्रणेवरही अचानक ताण येणार नाही.
कमी खर्चात, कमी वेळेत विद्यार्थ्यांना दाखले देऊन त्यांचा पुढील शैक्षणिक प्रवास सहज व सुलभकरण्याचे आमचे नियोजन आहे.- कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी.
0 Comments