मोठी बातमी..! सावकारकीतून बळकावलेली साडेअकरा एकर जमीन शेतकऱ्यांना परत;
जिल्हा उपनिबंधकांचा आदेश; 'या' प्रकरणांचा झाला निर्णय
एका महिन्यात सावकारकीतून बळकावलेली ११ एकर २६ गुंठे जमीन मूळ मालकाला परत देण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी दिले आहेत.
ही जमीन बेलाटी (उत्तर सोलापूर), चिंचखोपन (बार्शी) तसेच करमाळा तालुक्यातील वांगी व रावगाव येथील आहे.
बार्शी तालुक्यातील चिंचखोपन येथील गट नंबर १७ मधील दोन हेक्टर क्षेत्र बाबासाहेब भागवत पवार यांच्या मालकीची होती.
या गटातील दोन हेक्टर क्षेत्र पवार यांच्याकडून अकोलेकाटी (उत्तर सोलापूर) येथील पुष्पाबाई गवळी यांनी २०१३ मध्ये सावकारकीतून खरेदी केली होती.
गवळी यांनी ही जमीन २०१८ मध्ये जवळगाव येथील सुमन अंऋषी कापसे व प्रशांत अंऋषी कापसे यांना खरेदी दिली.
जिल्हा उपनिबंधक गायकवाड बाबासाहेब किरण यांनी पवार यांच्याकडून पुष्पाताई गवळी व गवळी यांच्याकडून सुमन कापसे व प्रशांत कापसे यांना दिलेली खरेदी रद्द करीत दोन हेक्टर क्षेत्र मूळ मालक बाबासाहेब पवार यांना देण्याचे आदेश दिले आहेत.
बेलाटी (उत्तर सोलापूर) येथील सुनील काटकर यांची ८१ आर (दोन एकर एक गुंठा) जमीन सावकारकीतून मनोहर मासाळ यांनी २०१४ मध्ये खरेदी घेतली होती.
काटकर यांनी २०२० मध्ये दाखल केलेल्या दाव्याचा निर्णय फेब्रुवारी २५ मध्ये लागला. यामध्ये काटकर यांना जमीन परत देण्याचा आदेश झाला.
रावगाव (करमाळा) येथील अशोक दशरथ शिंदे यांची दीड एकर जमीन सावकारकीतून इस्माईल फकीर शेख यांनी २०१४ मध्ये खरेदी केली होती. हे क्षेत्र इस्माईल यांनी २०१७ मध्ये गणेश अडसूळ (म्हाळंगी, ता. कर्जत) यांना विक्री केले होते.
या दोन्ही खरेदी रद्द करीत जमीन मूळ मालक अशोक शिंदे यांना परत देण्याचा निर्णय दिला आहे. वांगी (करमाळा) येथील एक हेक्टर २३ आर क्षेत्र मयूर जाधव यांच्याकडून संजय काळे (बेलवडी, इंदापूर)
यांनी सावकारकीच्या पैशातून २०१६ मध्ये खरेदी केले होते. २०२१ मध्ये दाखल दाव्याचा निर्णय २०२५ मध्ये झाला. ही जमीन मूळ मालक अशोक शिंदे यांना परत देण्याचा आदेश झाला आहे.
दोन वर्षे अन् १०२ निर्णय..
विद्यमान जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड हे फेब्रुवारी २०२३ मध्ये रुजू झाले होते. दोन वर्षात त्यांनी अनेक वर्षापासून पेंडिंग असलेले १०२ दावे निकाली काढले आहेत.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर दावे निकाली प्रथमच झाले आहेत. वरचेवर सावकारकीच्या तक्रारींची संख्या वाढत असल्याचे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी सांगितले.
0 Comments