महाविकास आघाडीतील लोकप्रतिनिधींचे वरातीमागून घोडे..! भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांची खोचक टीका
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे 9503487812)
सांगोला (तालुका प्रतिनिधी): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे,
माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर, माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या अथक परिश्रमामुळेच टेंभू, म्हैसाळ, निरा उजवा कालवा
हे सिंचन प्रकल्प मार्गी लागले आहेत. सांगोल्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने टेंभू, म्हैसाळचे आवर्तन चालू करून माण व कोरडा नदीवरील बंधारे भरून देण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
यांनी टेंभू, म्हैसाळचे आवर्तन चालू करून बंधारे भरून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. माण व कोरडा नदीत पाणी येण्याचे दिसताच महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधींनी पाणी मागणीचे निवेदन देत
फोटोसेशन केल्याने सदरचा प्रकार म्हणजे महाविकास आघाडीतील लोकप्रतिनिधींचे वरातीमागून घोडे.....अशी खोचक टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केली आहे.
यावेळी बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत म्हणाले की, २०१४ साली मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी
सांगोला तालुक्यासह राज्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधीची तरतूद केली. दुष्काळी सांगोला तालुक्याला पाणी मिळावे यासाठी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर,
माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या अथक परिश्रमामुळेच तसेच कोट्यावधी रुपयांच्या निधीची तरतूद झाल्याने टेंभू, म्हैसाळ, निरा उजवा कालवा हे सिंचन प्रकल्प मार्गी लागले आहेत.
दरम्यान सांगोला तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांची भेट घेऊन
टेंभू, म्हैसाळ सिंचन प्रकल्पाचे आवर्तन सुरू करून माण व कोरडा नदीवरील बंधारे भरून देण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माण व कोरडा नदीवरील बंधारे तात्काळ भरून द्यावेत अशा सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या होत्या. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करत
तात्काळ माण व कोरडा नदीवरील बंधारे भरून देण्याचे नियोजन केले आहे. मात्र पाणी प्रश्नाविषयी खोटा कळवळा असणारे महाविकास आघाडीतील लोकप्रतिनिधी पाणी मागणीचे निवेदन देत फोटोसेशन करण्यात व्यस्त आहेत.
माण व कोरडा नदीत पाणी येणार असल्याचे समजल्यानंतर महाविकास आघाडीतील लोकप्रतिनिधींना जाग आली असून फुकटचे श्रेय घेण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.
महाविकास आघाडीतील लोकप्रतिनिधी हे फक्त आयत्या पीठावर रेघोट्या मारण्याचे काम करीत असून जनतेच्या प्रश्नाचे त्यांना काहीही देणे घेणे नाही.
हा प्रकार म्हणजे महाविकास आघाडीतील लोकप्रतिनिधींचे वरातीमागून घोडे.... आहे अशी खोचक टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केली आहे.
0 Comments