सांगोला धक्कादायक प्रकार! २० जणांना भगरीतून विषबाधा, अन्नसुरक्षा विभागाने भगर
अन् साबुदाण्याचे नमुने घेतले ताब्यात; उलटी, जुलाब, मळमळचा त्रास सुरु
सांगोला शहरात भगरीच्या पिठातून झालेल्या विषबाधेतून अनेक जणांना उलटी, जुलाब, मळमळचा त्रास होऊ लागल्याने २० जणांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉक्टरांकडून वेळीच उपचार केल्याने अनुचित घटना टळली आहे.ही घटना गुरुवार, ३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री घडली.
दरम्यान, बाधित रुग्णांवर उपचारानंतर सुधारणा झाल्याने डॉक्टरांकडून डिस्चार्ज देण्यात आला. नवरात्रीनिमित्त उपवासाला घरोघरी साबुदाणा, भगरीसह इतर अनेक उपवासाच्या पदार्थाला मागणी असते. उपवास काळात अल्पोपाहार म्हणून भगरीचा अधिक वापर केला जातो.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मनोजकुमार ढोले यांच्या कुटुंबातील सदस्यांनी गुरुवारी रात्री घरी भगरीच्या पिठापासून बनवलेली भाकरी खाल्ली होती.
दरम्यान, मध्यरात्रीनंतर कुटुंबातील ९ ते १० जणांना उलटी, मळमळ व जुलाबाचा त्रास जाणवू लागला, तर इतर अन्य जणांनादेखील विषबाधा झाल्याने त्यांना शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सोलापूर येथील अन्नसुरक्षा अधिकारी उमेश भुसे यांनी तातडीने सांगोल्यात येऊन रुग्णालयात बाधितांची भेट घेऊन रुग्णांची विचारपूस केली.
संबंधित किराणा दुकानामधून भगर, साबुदाणा भगरीच्या पिठाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले. मात्र, या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसांत कोणीही तक्रार दिली नव्हती.
0 Comments