सांगोला तालुक्यात बेकायदेशीर सावकारी केल्यास कडक कारवाई करणार
सहा. निबंधक प्रकाश नालवार यांनी दिला इशारा; परवान्याचे नूतनीकरण रखडले
सांगोला : सांगोला तालुक्यात एकूण ३५ जणांकडे सावकारीचा परवाना आहे. त्यापैकी केवळ १३ लोकांनी सावकारीच्या परवानाचे नूतनीकरण केले आहे.
उर्वरित २२ जणांनी सावकारीच्या परवान्याचे नूतनीकरण केले नाही. दरम्यान, २२ लोकांनी सावकारीच्या परवान्याचे नूतनीकरण करुन घ्यावे;
अन्यथा परवाना नसताना बेकायदेशीर सावकारी केल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सहायक निबंधक प्रकाश नालवार यांनी दिला आहे.
यासह बिगर परवाना सराफ कट्ट्यात सोनेतारण कर्ज वाटप करणाऱ्या सोने- चांदी दुकान अथवा ज्वेलरी दुकानदारांकडे परवाना नसेल आणि सोने तारण करून कर्ज वाटप
करताना आढळून आल्यास त्यांच्यावरदेखील कायदेशीर कारवाई केली जाईल, असाही इशारा दिला आहे.
सांगोला तालुक्यात सावकारीचा धुमाकूळ सुरू असल्याबाबत अनेकदा चर्चा होत असतात. यावर संबंधित नागरिकांनी सावकारीच्याबाबतीत सहाय्यक निबंध कार्यालयामध्ये येऊन अर्ज सादर करावा.
अर्ज सादर केल्यानंतर अर्जदाराचे नाव गुपित ठेवले जाईल आणि संबंधित परवाना नसलेल्या सावकारांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही यानिमित्ताने सांगण्यात आले आहे.
सांगोला तालुक्यात विनापरवाना सावकारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असल्याच्या चर्चा आहेत.
कमी श्रमात अधिक पैसा मिळवण्याच्या बाबतीत नागरिक आणि आजची तरुणाई मोठ्या प्रमाणात भरकटत चालली आहे.
यामध्ये सामान्य नागरिक कर्जबाजारी होताना दिसून येत आहे. टक्केवारीच्या नादात अनेकांनी आपले घरदार विकले आहे. अनेकजण आत्महत्यासारखी पावले उचलताना दिसून येत आहेत.
ही परिस्थिती बदलण्यासाठी यापुढीलकाळात विनापरवाना सावकारी व नियमबाह्य पद्धतीने सावकारी करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार आहे. - प्रकाश नालवार, सहा. निबंधक
0 Comments