माढ्यात नवा ट्विस्ट ! अभिजित पाटील यांनी लोकसभेला भाजपाला पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडीला धक्का
सोलापूर : माढ्यात आता नवीन ट्विस्ट समोर आल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी कारखाना सभासद ,
पदाधिकारी आणि विठ्ठल परिवाराच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत माढा आणि सोलापूर लोकसभेसाठी भाजपाला पाठिंबा जाहीर केला आहे .
दिवसभर चाललेल्या गावोगावच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्यासाठी संपूर्ण विठ्ठल परिवार भाजपच्या मागे ताकदीने उभा राहणार असल्याचे अभिजित पाटील यांनी सांगितले .
रात्री उशिरा झालेल्या या निर्णय मेळाव्यात माढा लोकसभेचे भाजप उमेदवार खासदार रणजित निंबाळकर आणि सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी हजेरी लावली होती .
यावेळी सर्व सभासद आणि कार्यकर्त्यांनी अभिजित पाटील यांच्या भूमिकेला एकमुखी पाठिंबा देत मोदी यांच्या मागे उभे राहण्याचा निर्णय घेतला .
चार दिवसापूर्वी अभिजित पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर शिखर बँकेने पूर्वीच्या 442 कोटी रुपये कर्जासाठी जप्तीची कारवाई केली होती .
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभंजित पाटील यांना दिलासा देण्याचे
आश्वासन दिल्यानंतर अभिजित पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे . या कारखान्यावर पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांच्या काळात झालेल्या
भ्रष्टाचारामुळे 2021 पासून शिखर बँकेची कारवाई सुरु असल्याचे अभिजित पाटील यांनी सांगितले. फडणवीस यांनी तातडीने दिलासा देऊन कारखान्याला जीवनदान दिल्याने आम्ही कारखान्यासाठी हा निर्णय घेत
माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे रणजित निंबाळकर आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे राम सातपुते याना पाठिंबा दिल्याचे जाहीर केले.
शरद पवार यांचे अतिशय निकटवर्तीय अशी अभिजीत पाटील यांची ओळख
अभिजित पाटील हे राष्ट्रवादी फुटल्यापासून शरद पवार यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून जिल्ह्यात ओळखले जात होते . विठ्ठल कारखाना
आणि विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून दोन्ही मतदारसंघातील एक मोठी ताकद म्हणून अभिजित पाटील यांची ओळख आहे . अभिजित पाटील यांचा एक कारखाना सांगोला येथेही असल्याने माढा
लोकसभा मतदारसंघात खूप मोठी मतांची ताकद भाजपाला होणार आहे . याचसोबत पंढरपूर आणि मंगळवेढ्यात असणारे पाटील यांचे हजारो कार्यकर्ते आता राम सातपुते यांचा प्रचार करणार आहेत.
शहाजीबापूंनी केली तुफानी टोलेबाजी
अभिजित पाटील यांनी आता योग्य निर्णय घेतला असून याचा फायदा विठ्ठल कारखाना आणि त्यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीला होईल असे आमदार शहाजीबापू यांनी सांगितले .
अभिजित पाटील यांची माढा लोकसभा मतदारसंघात किमान 50 हजार तर सोलापूर लोकसभा मतदारसंघात 25 हजार मते असून तुतारी आणि
पंज्याला जाणारी ही मते भाजपाकडे वळल्याने याचा दुप्पट फायदा भाजपाला होणार असल्याचे शहाजीबापू यांनी सांगितले . माढा लोकसभा मतदारसंघातून रणजीत सिंह निंबाळकर दोन लाख मतांनी तर
सोलापूर मतदारसंघातून राम सातपुते घासून 70 ते 80 हजार मतांनी विजयी होईल असा दावा शहाजीबापू यांनी केला . आपल्याला वाचासिद्धी असून माझे हे दोन्ही
भाकीत खरे झाल्यावर तुम्ही मला भविष्यकाळ म्हणाल अशी कोटीही करीत शेवटच्या तीन दिवसात अजून बऱ्याच घडामोडी घडतील असा दावाही शहाजीबापू यांनी माध्यमांशी बोलताना केला.
भाजपाला माढा व सोलापूर मतदारसंघात पाठिंबा
यापूर्वी आपल्या भाषणात शहाजीबापू यांनी शरद पवार , विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर खुमासदार भाषेत जोरदार टोलेबाजी केली. अभिजित पाटील आणि त्यांच्या विठ्ठल परिवाराने
भाजपाला माढा व सोलापूर मतदारसंघात पाठिंबा दिल्याने त्यांचे व कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील या सभेत आल्याचे रणजित निंबाळकर यांनी सांगितले .
अकलूजला रावण जन्मला आणि आमच्या उरावर बसला, आता परत जन्माला घालू नका; शहाजीबापूंचा मोहिते पाटलांवर जहरी 'बाण'
0 Comments