मोठी बातमी...माढ्यात भाजपला पुन्हा धक्का; मोहिते पाटील-जानकर येणार एकत्र !
धैर्यशील मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे.
महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे तथा पूर्वाश्रमीचे भाजपचे कट्टर नेते उत्तम जानकर आणि मोहिते पाटील एकत्रित येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
'लोकसभेच्या मोबदल्यात विधानसभेला मदत' या सूत्रानुसार दोन्ही गटांत मतेक्य झाले, तर माढ्यात भाजपला पुन्हा धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मोहिते पाटील यांच्यानंतर माढ्यात भाजपला आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
माळशिरस तालुक्यातील महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तम जानकर हे मोहिते पाटील यांच्यासोबत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
लोकसभेला मोहिते पाटील यांना, तर विधानसभेला उत्तम जानकर यांना मदत करण्याच्या अटीवर दोन्ही गट एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. खुद्द उत्तम जानकर यांनी त्याला दुजोरा दिला आहे.
उत्तम जानकर म्हणाले, माळशिरस तालुक्यात मी भाजपचे काम करत आहे. माझ्या अगोदर सुभाष पाटील पक्षाचे काम करत होते. ज्या ज्या वेळी भाजपची सत्ता आली,
त्या त्या वेळी विकासाचे कोणतेही काम झालेले नाही. आम्हाला माळशिरस तालुक्यात न्याय आणि ताकद देणे अपेक्षित होते, पण तसं पक्षाकडून झालेलं नाही.
त्यामुळे विधानसभेची २०१९ ची उमेदवारी आणि आता सोलापूर लोकसभेची उमेदवारी आपल्याला मिळेल, अशी आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती. पण ती उमेदवारी न मिळाल्याने आमचे कार्यकर्ते नाराज आहेत.
आमच्या कार्यकर्त्यांना वाटतंय की लोकसभेला मोहिते पाटलांना मदत करावी आणि मोहिते पाटील यांनी आपल्याला विधानसभेला मदत करावी. ही चर्चा प्राथमिक स्वरूपात आहे.
या गोष्टीला मूर्त रूप आले, तर एकट्या माळशिरस तालुक्यातून एक लाख ८० हजार ते दोन लाखांच्या आसपास लीड मोहिते पाटील यांना मिळेल, असा दावाही जानकर यांनी केला.
आमच्या एकत्र येण्याचा बारामती आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघावर परिणाम होऊ शकतो.
बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची संख्या मोठी आहे, तर सोलापूर जिल्ह्यात ४ लाख ७४ हजार इतक्या मोठ्या प्रमाणात धनगर समाज आहे.
ही संख्या निकालावर परिणाम करणारी आहे. आम्ही एकत्र आलो तर आम्हाला माळशिरसमध्ये काही कामच राहत नाही, असेही जानकर यांचे म्हणणे आहे.
0 Comments