खळबळजनक दावा..ठाकरे-मोदी १००० टक्के एकत्र येणार! दीपक केसरकरांनंतर आता शहाजी बापू पाटील यांचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
मुंबई : महाराष्ट्राचे राजकारण गेल्या ५ वर्षात अतिशय बेभरवशाचे झाले. कोणता नेता कोणत्या पक्षासोबत युती करेल आणि कोणता पक्ष कोणत्या पक्षासोबत आघाडी करेल हा अंदाज बांधनेच चुकीचे ठरत आहे.
त्यातच, आता भाजपा आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकत्र येऊ शकतात, अशी शक्यता शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने वर्तवली आहे.
काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे दोघेजण दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून आल्याचा दावा शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केला.
त्यानंतर, आता आमदार शहाजी बापू पाटील यांनीही १००० टक्के मोदी-ठाकरे एकत्र येणार असल्याचे म्हटले आहे.
आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे दोघेजण दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्याचे दीपक केसरकर यांनी म्हटले,
त्यांनी काही माध्यमांत आलेल्या बातम्यांचा दाखला देत हे विधान केले. मात्र, उद्धव ठाकरे यांनी दोनवेळा दिलेला शब्द फिरवला आहे.
त्यामुळे, आता त्यांना जवळ करायचे की नाही, हे पंतप्रधान मोदी यांनी स्वत:च ठरवावे, पण, यानिमित्ताने ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा भाजपासोबत येण्याच्या हालचाली सुरु असल्याचे सिद्ध झाले आहे.
शिवसेना ठाकरे गट पुन्हा एकदा भाजपासोबत एनडीए आघाडीत आला तर राज्यातील राजकीय समीकरण बदलणार आहे, असेही दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
आता, ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’ फेम आमदार शहाजी बापू पाटील यांनीही मोदी आणि ठाकरे एकत्र येणार असल्याचा मोठा दावा केला.
सांगोला तालुक्यातील महुद येथील सरपंचांनी कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी, प्रसार माध्यमांशी बोलताना शहाजी बापू पाटील यांनी हा गौप्यस्फोट केला.
उद्धव ठाकरे पुन्हा एनडीएसोबत येणार, अशी चर्चा सुरू आहे, त्याकडे आपण कसे पाहता, असा सवाल शहाजी बापू पाटील यांना विचारण्यात आला होता.
त्यावर उत्तर देताना, ‘मी याकडं कस-बिसं बघत नाही. एक हजार टक्के उद्धव ठाकरे आणि मोदीसाहेब एकत्र येणार आहेत. आपला अंदाज चुकणार नाही, दिवस कुठला आहे, हे बघा.
हे व्हावंच लागेल, याला कारण म्हणजे हिंदुत्वाचा विचार. तो बाजूला ठेऊन चालणार नाही. उद्धव ठाकरेंना मोदींकडे जावं लागेल
यात कुठली शंका नाही, लवकरात लवकर हा दिवस येणार आहे, असे उत्तर शहाजी बापू पाटील यांनी दिले.
0 Comments