खळबळजनक...सरपंच पत्नी,पती विरुद्ध १०हजार रुपयांची
लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल ; सांगोला तालुक्यात खळबळ
सांगोला : ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेल्या कामाचे बिल काढण्यासाठी सरपंचपती तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडला.
याबाबत आलेगाव ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच नंदाबाई पांडुरंग दिवसे व त्यांचे पती पांडुरंग रामचंद्र दिवसे (रा. आलेगाव, ता. सांगोला) यांच्याविरुद्ध लाचलुपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदारास आलेगाव (ता. सांगोला) येथील बाबरवाडी हनुमान मंदिरासमोरील सभागृहाचे काम मिळाले होते. हे काम तक्रारदाराने पूर्ण केल्यानंतर त्यांनी बिल मिळण्यासाठी ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा केला.
याबाबत आलेगाव ग्रामपंचायतच्या महिला सरपंचांचे पती पांडुरंग दिवसे यांनी तक्रारदाराकडे आठ हजार रुपये लाचेची मागणी केली. यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर यांना तक्रार दिली.
तक्रारीच्या अनुषंगाने १७ जानेवारी, २३ जानेवारी व २९ जानेवारी २४ रोजी पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी केली असता, पांडुरंग दिवसे यांनी तक्रारदाराकडे यापूर्वी केलेल्या
कामाचे दोन हजार रुपये व सध्याच्या कामाचे आठ हजार रुपये असे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत महिला सरपंचाकडे पडताळणी केली
असता त्यांनी लाचेची रक्कम त्यांचे पती पांडुरंग दिवसे यांच्याकडे देण्यास सांगितले. गुरुवारी (ता. १५) तक्रारदाराकडून दहा हजारांची लाच स्वीकारताना सरपंचाच्या पतीला रंगेहाथ पकडण्यात आले.
लाचलुचपत विभागाच्या वतीने पोलिस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलिस अंमलदार प्रमोद पकाले, पोलिस शिपाई गजानन किणगी, राहुल गायकवाड, श्याम सुरवसे यांनी या कारवाईसाठी सापळा रचला होता.
सांगोला तालुक्यात विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आला आहे. परंतु ग्रामपंचायत व इतर विभागांमध्ये काम केलेल्या कामांसाठी लाचेची मागणी होत
असल्याची चर्चा सुरू होती. आलेगाव येथील सरपंच व त्यांच्या पती विरोधात लाचेची मागणी केल्याने गुन्हा दाखल झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.


0 Comments