'मोदी आवास'मधून ११ हजार घरकुलांना मंजुरी; उद्दिष्ट पूर्ण करणारी सोलापूर झेडपी राज्यात अव्वल
सोलापूर : राज्य सरकारच्या मोदी आवास योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील १० हजार २९३ ओबीसी तर विशेष मागास प्रवर्गातील ७२६ लाभार्थींच्या घरकुलांना सोलापूर जिल्हा परिषदेने मंजुरी दिली आहे.
जानेवारीअखेरीस सर्व लाभार्थींना बांधकामासाठी १५ हजाराचा पहिला हप्ता मिळणार आहे. दोन महिन्यात उद्दिष्टानुसार १०० टक्के लाभार्थींना मंजुरी देणारी सोलापूर जिल्हा परिषद राज्यात अव्वल ठरली आहे.
ओबीसी लाभार्थींना घरकूल बांधणीसाठी पहिला हप्ता १५ हजार रुपयांचा, दुसरा हप्ता ४५ हजार रुपये तर तिसरा हप्ता ४० हजार आणि शेवटचा हप्ता २० हजार रुपये, असे एकूण एक लाख २० हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
तसेच 'मनरेगा'तून मजुरीपोटी २३ हजार २८० रुपये आणि स्वच्छ भारत मिशन अभियानाअंतर्गत शौचालयासाठी १२ हजार रुपये देखील दिले जाणार आहेत.
ज्या लाभार्थींना घरकूल बांधणीसाठी स्वत:ची जागा नाही, अशांना आता एक लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
तत्पूर्वी, मोदी आवास योजनेतून पुढील दोन वर्षात आणखी २४ हजार लाभार्थींना घरकूल मिळणार आहेत. या योजनेच्या लाभार्थींकडे जात प्रमाणपत्र बंधनकारक आहे. पहिल्या वर्षीचे उद्दिष्ट विलंबाने प्राप्त झाले होते,
तरीदेखील जिल्हा परिषदेने अवघ्या दोनच महिन्यात १०० टक्के लाभार्थींचे प्रस्ताव मागवून त्यांना मंजुरी दिली आहे हे विशेष. राज्यातील इतर कोणत्याही जिल्हा परिषदेने २०२३-२४मधील १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण केलेले नाही.
फेब्रुवारीत पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र दौरा
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रावर विशेष लक्ष आहे. जानेवारीत त्यांनी नाशिक, मुंबई व सोलापूर असा दोनदा दौरा केला आहे.
आता राज्य सरकारच्या महत्त्वपूर्ण योजनांच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान मोदी हे फेब्रुवारी महिन्यात पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
त्यावेळी राज्यातील सव्वातीन लाख ओबीसी व एसबीसी प्रवर्गातील बेघर लाभार्थींना घरकूल बांधणीचा पहिला हप्ता (प्रत्येकी १५ हजार रुपये) पंतप्रधानांच्या हस्ते वितरित होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
नमो शेतकरी महासन्मान योजनेनंतर महाराष्ट्र सरकारने मोदी आवास योजना देखील पंतप्रधानांच्याच नावे सुरू केली आहे.
तालुकानिहाय ओबीसी लाभार्थी
तालुका - मंजूर घरकूल
सांगोला -१३९१, पंढरपूर - १३३५ , माळशिरस- १२५४, मंगळवेढा -११९८ , करमाळा - १०६९ , द. सोलापूर- १०५९ , मोहोळ -१०५३ ,माढा -८८२ ,बार्शी -७३९ ,अक्कलकोट -६०२ ,उ. सोलापूर -४३७
जिल्ह्यातील प्रत्येक बेघर कुटुंबाला हक्काचा निवारा मिळावा, यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. गावचे सरपंच, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी,
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक व इतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून निश्चितपणे बेघरांना घरकूल मिळतील असा विश्वास आहे.
- मनीषा आव्हाळे, मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर
0 Comments