सोलापूर पोलीस दलात खळबळ ; पोलिस कर्मचाऱ्याने जीवन संपवले; संशयित पत्नीस अटक
करमाळा येथील पोलीस कर्मचाऱ्याने बुधवारी रात्री राहत्या घरी जीवन संपवले. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
आकाश गोते (वय 26) रा.मूळ घोळवेवाडी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर हल्ली मुक्काम करमाळा असे जीवन संपवलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
या प्रकरणी मृत गोते यांच्या पत्नीसह एका पोलीस हवालदारा विरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे वृत्त आहे.
गोते हे सहा महिन्यापूर्वी करमाळा येथे सोलापूरवरून बदली झाल्याने करमाळा पोलीस स्टेशन येथे आले होते. ते त्यांच्या पत्नीसह करमाळा येथे वास्तव्यास होते.
त्यांची पत्नी ही करमाळा पोलीस स्टेशन येथे महिला पोलीस कर्मचारी म्हणून कर्तव्यावर आहे.
त्या कर्तव्यावर असताना आकाश तोगे यांनी त्यांच्या राहत्या घरी बुधवारी रात्री अज्ञात कारणाने जीवन संपवले. तोगे यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे.
त्यांच्या जीवन संपवण्याने मात्र करमाळा पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या पाठिमागील कारण अद्यापही अधिकृतपणे समजू शकले नाही.
या प्रकरणी संशयित म्हणून महिला पोलीस कर्मचारी असलेल्या पत्नीस अटक करण्यात आली आहे. तसेच एक संशयित पोलिस फरार असल्याचे सांगितले जात आहे.
याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक चंदनशिवे हे पुढील तपास करीत आहेत. मृत तोगे यांच्यावर त्यांच्या मूळ गावी घोळवेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान करमाळा पोलीस ठाण्यातील ही काही वर्षांतील दुसरी घटना असुन पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
या प्रकारची गंभीर घटना घडतानाही अधिकृतरित्या माहिती उपलब्ध होत नसल्याने सर्वत्र संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.


0 Comments