सांगोला तालुक्यात 51 जेसीबी, 100 हलग्या..;
खासदार निंबाळकरांसह शहाजीबापूंची विराट रॅली; लोकसभेचा नारळ फोडला
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्याला टेम्भू, म्हैसाळसह आता 884 कोटी रुपयाची बाळासाहेब ठाकरे सांगोला उपसा सिंचन योजनेस मंजुरी मिळाली आहे.
त्यामुळे सांगोला येथे विराट वचनपूर्ती सभेचे आयोजन आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले होते.
यावेळी सांगोला तालुक्यातील महूदपासून सांगोल्यापर्यंत खासदार रणजित निंबाळकर, शहाजीबापू पाटील आणि दीपक साळुंखे यांची विराट रॅली काढण्यात आली.
या मार्गावर ठिकठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने नेत्यांवर फुलांची उधळण करण्यात आली. या रॅलीसमोर 100 पेक्षा जास्त हलग्यांच्या कडकडाट करीत प्रत्येक गावात या रॅलीचे स्वागत करण्यात आले.
त्यानंतर सायंकाळी रॅली सांगोल्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सभास्थानी पोचली. त्यामुळे या सभेतून लोकसभेचा नारळ फोडण्यात आल्याची देखील चर्चा आहे.
दरम्यान यावेळी बोलतांना रणजित निंबाळकर म्हणाले, "एमआयडीसी व इतर मागण्या आता दुसऱ्या टर्ममध्ये पूर्ण करू असे थेट वक्तव्य माढाचे खासदार रणजित निंबाळकर यांनी केले.
सांगोला येथे झालेल्या विराट वचनपूर्ती सभेत त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे माढ्यासाठी पुन्हा निंबाळकर हेच रिंगणात असणार अशी सुद्धा चर्चा आहे.
सांगोला भागातील पाणीप्रश्न संपला : निंबाळकर यावेळी पुढे बोलतांना खासदार रणजित निंबाळकर म्हणाले
की, "दुष्काळी माढा लोकसभा मतदारसंघाची पुढची निवडणूक पाणीप्रश्नावर होणार नाही हे आपले वचन पूर्ण झाले आहेत. माढा, करमाळा,
सांगोला, पंढरपूर, माळशिरस, माण खटाव आणि फलटण भागात केलेल्या कामांची भली मोठी यादी देखील त्यांनी यावेळी वाचून दाखवली. सांगोला भागातील पाणीप्रश्न संपला.
आता येथे एमआयडीसी देण्याची मागणी होत असून, हे काम दुसऱ्या टर्मसाठी घेऊ असे आश्वासन देत दुसऱ्या टर्मसाठी तुम्ही सोबत असणार ना," असा सवाल निंबाळकर यांनी विचारला.
आईला दिलेला शब्द पूर्ण केला : शहाजीबापू
यावेळी बोलतांना शहाजीबापू म्हणाले की, आता या पाण्यामुळे प्रत्येकाच्या खिशात पैसे खुळखुळेल, नवीन उद्योग सुरु होतील.
मी आपल्या आईला दिलेला शब्द पूर्ण केल्याचे सांगत शहाजीबापू यांनी लहानपणी पाण्यासाठी कशा मारामाऱ्या व्हायच्या तो किस्सा सांगितला.
आजवर जेवढे खासदार आले त्यांनी कोणतीच कामे केले नाहीत. पूर्वीच्या खासदारांची नावं काय घेता असे सांगत शरद पवार आले,
मोहिते पाटील आले आणि खासदारकी भोगून निघून गेल्याचा टोला शहाजीबापू यांनी लगावला. आई म्हणायची शहाज्या पुढारपण करतो, लई मोठे बोलतो तर पाणी आणून दाखव. आज तो शब्द पूर्ण केला आहे.
यावेळी बोलतांना त्यांनी शरद पवार यांच्या आवाजाची नक्कल करीत पूर्वी जेंव्हा सांगोल्याला पाणी मागायला गणपतराव देशमुख यांच्यासोबत जायचो तेंव्हा शरद पवार कशी बोळवण करायचे याची नक्कल शहाजीबापू यांनी केली.





0 Comments