सांगोला तालुका बागलवाडी येथे पतीच्या निधनानंतर संघर्षातून
दुःख झेलत माऊलीने आपल्या मुलाला पोलिस उपनिरीक्षक बनवले मुलाला दाखविला यशाचा महामार्ग
सांगोला :- मुलगा दोन वर्षाचा असताना पतीचे अपघाती निधन झाले. आभाळ कोसळल्याचे दुःख झेलत माऊलीने आपल्या मुलाला पोलिस उपनिरीक्षक बनवले.
नुकतेच मुंबई येथे मुलाने पोलिस उपनिरीक्षकचा पदभार स्वीकारल्यानंतर आईच्या डोळ्यातील आनंदाश्रू वाहू लागले.
पावलोपावली संघर्ष करीत जिद्दीने आपल्या एकुलत्या एक मुलाला यशस्वी करून ग्रामीण भागातील समाजापुढे सुनीता चव्हाण यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.
दुष्काळी सांगोला तालुक्यातील बागलवाडी या गावातील हणमंत चव्हाण यांचे छोटेसे सुखी कुटुंब.
मुलगा दोन वर्षाचा असतानाच हणमंत चव्हाण यांचे जम्मू काश्मीरमध्ये अपघाती निधन झाले.
घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यामुळे माऊलीच्या डोक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. अशा प्रतिकूल परिस्थितीत माऊलीने आपल्या मुलाला काहीतरी बनवण्याचा निश्चय केला.
जीवनाच्या वाटेवरील संघर्षावर एक एक पाऊल ठेवत माऊलीने आपल्या मुलाचे शिक्षण सुरू ठेवले.
मुलगा संतोषनेही राज्यशास्त्र या विषयात पदवी आबासाहेब गरवारे कॉलेज, पुणे येथून २०१४ साली पूर्ण केली. खरंतर संतोषला बारावीनंतर इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला होता.
परंतु आईचे स्वप्न आपल्या मुलाला पोलिस अधिकारी बनवायचे असल्याने संतोषने इंजिनिअरिंग ऐवजी बी. एला प्रवेश घेतला.
बी. ए. पूर्ण झाल्यानंतर ''एमपीएससी''च्या अभ्यासाला सुरवात केली. २०१७ ला सर्व टप्पे पूर्ण केले, परंतु अंतिम निवड झाली नाही.
नावातच नव्हे, यूपीएससीतही दाखविला 'करिष्मा'; नायर यांची यशकथा, दुसऱ्याच प्रयत्नात देशात १४ वा रँक
२०१९ ला झालेल्या परीक्षेची मुलाखत व शारीरिक चाचणी तब्बल अडीच वर्षांनी झाली. त्यामुळे संतोषला वारंवार दुखापतीला सामोरे जावे लागले.
शारीरिक चाचणीत अपेक्षेपेक्षा थोडे कमी मार्क आल्याने आपले काय होईल या विचाराने संतोष मुलाखतीनंतर तो टेन्शनमध्ये असायचा.
परंतु या परीक्षेत संतोषची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. १ ऑगस्ट २०२२ पासून एक वर्षाचे महाराष्ट्र पोलिस अकॅडमी, नाशिक येथे प्रशिक्षण संतोषने पूर्ण केले. १ ऑगस्ट २०२३ पासून लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाणे, मुंबई येथे नेमणूक मिळाली आहे.
ज्या दिवशी मुलाच्या अंगावर पोलिसाची वर्दी माऊलीने पाहिले असता माऊलीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. आईने ठरवलेले स्वप्न पूर्ण केल्याने मुलालाही तितकाच आनंद त्यावेळी झाला. गावानेही अभिमानाने संतोष चव्हाण यांचे स्वागत केले.
मुलाचे शिक्षण पूर्ण करीत त्यांचा संभाळ करणे हे माझे कर्तव्यच आहे. परंतु माझे स्वप्न मुलगा संतोषने पूर्ण केल्यामुळे मला मनापासून फार आनंद होत असल्याची प्रतिक्रिया संतोषच्या आई सुनीता चव्हाण यांनी दिली.
ध्येय गाठणे कर्तव्य
मला पावलोपावली आईच्या कष्टाची जाणीव होती. त्यामुळेच मला ज्या क्षेत्रात यश मिळवायचे होते ते क्षेत्र वेगळे असले तरी ते ध्येय गाठणे माझे कर्तव्य होते.
माझ्या अंगावर पोलिसाचा वेश पाहिल्यानंतर आईच्या डोळ्यातील अश्रू मला नेहमी आठवत राहतील अशी प्रतिक्रिया पोलिस उपनिरीक्षक संतोष चव्हाण यांनी दिली.
0 Comments