सोलापूरात लवकरच ११५ नव्या ओपन जीम; आमदारांचे जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव
सोलापूर जिल्ह्यात ११५ ठिकाणी लवकरच नव्या ओपन जीम उभारल्या जाणार असून तसे निधी मागणीचे प्रस्ताव आमदारांनी जिल्हा नियोजन समितीकडे दिले आहेत.
युवकांचे आरोग्य आणि फिटनेससाठी निवडणुकांच्या तोंडावर का असेना आमदार सक्रिय झाल्याचे दिसत आहे.आजकालचा युवक हा आपल्या फिटनेसबाबत अधिक जागरुक असल्याचे दिसत आहे.
त्यामुळे केवळ शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातूनही व्यायामशाळा आणि ओपन जीमची मागणी होऊ लागली आहे. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरूनही आमदारांना साकडे घातले जाऊ लागले आहे.
निवडणुकीच्या काळात कामाला येणारे युवा कार्यकर्तेही ओपन जीमची मागणी करतात. त्यांच्या मागण्या आमदारांना मान्य कराव्याच लागतात.
आता तर निवडणुका तोंडावर आल्याने आमदारांकडून आपापल्या मतदारसंघात ओपन जीमचे उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
तसे प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे आले आहेत. त्याच्या तांत्रिक बाबी पाहून जागा निश्चिती करून उपलब्ध निधीनुसार क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत ओपन जीम आणि व्यायामशाळा उभारल्या जाणार आहेत.
जिल्हा नियोजन समितीकडून व्यायामशाळा व क्रीडांगण विकास योजनेसाठी प्रत्येकी ३.७५ कोटी रुपये निधी राखीव ठेवला जातो.
त्यातून मागणीनुसार ओपन जिमसाठी ७ लाख रुपये तर व्यायाम शाळा बांधकाम व साहित्यासाठी १४ लाख मंजूर केले जातात.
जिल्ह्यातील सर्वच आमदारांकडून ओपन जीम आणि व्यायामशाळांसाठी प्रस्ताव आल्याने निवडणुकांच्या तोंडावर आमदार सक्रिय झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
व्यायामशाळांचे बांधकाम व त्यातील तांत्रिक बाजू तपासायला लागणारा विलंब याच्या तुलनेत ओपन जीमची कामे लवकरच पूर्ण होतील अशी आशा आहे.
जिल्ह्यातून ओपन जीमसाठी ११५ आणि व्यायामशाळांसाठी ७७ प्रस्ताव आले आहेत. निधीच्या उपलब्धतेनुसार त्या त्या ठिकाणी ओपन जीम आणि व्यायामशाळा उभारण्यात येतील.
या कामांना जास्तीचा निधी मिळावा यासाठीही क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत प्रस्ताव दिला जाणार आहे.
- नरेंद्र पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातून मिळालेल्या आकडेवारीनुसार
मतदार संघ - आमदार -ओपन जीमचे प्रस्ताव - व्यायामशाळा प्रस्ताव
सोलापूर मध्य - प्रणिती शिंदे - १५ - ५
सोलापूर उत्तर विजयकुमार देशमुख - ७ -८
सोलापूर दक्षिण -- सुभाष देशमुख - ७ -९
अक्कलकोट - सचिन कल्याणशेट्टी - १०- ८
मोहोळ - यशवंत माने - २२ - १३
पंढरपूर - समाधान आवताडे - १० -७
सांगोला - शहाजी पाटील - ११ - ९
माळशिरस - राम सातपुते - ८ - ४
करमाळा - संजय शिंदे - ७- ३
माढा - बबनराव शिंदे - ९ -८
बार्शी - राजेंद्र राऊत - ९ -३
एकूण - ११५ - ७७
0 Comments