धक्कादायक घटना... रिक्षाला पाठीमागून भरधाव कारची धडक,
रिक्षातून बाहेर फेकल्याने तरुणीचा दुर्दैवी अंत; सोलापुरात भीषण अपघात
सोलापूर शहरात अपघाताचे प्रमाण वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे. त्यातच आज एक धक्कादायक घटना घडली आहे. रिक्षाला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोराची धडक
दिल्याने एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. आज सकाळी साडेसातच्या सुमारास सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर अहिल्यादेवी होळकर
सोलापूर विद्यापीठासमोर हा भीषण अपघात घडला. यात अकरावीत शिकणारी १७ वर्षीय भाग्यश्री निवृत्ती कांबळे (राहणार कोंडी) हिचा मृत्यू झाला आहे. कोंडी येथून सोलापूर शहरात कॉलेजसाठी निघालेल्या
रिक्षा (क्रमांक एमएच १३, सीटी ९४७९) यास सोलापूर विद्यापीठासमोर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडून सोलापूरकडे चाललेल्या कारने मागून जोरदार धडक दिली. दरम्यान ही धडक इतकी जोरात होती की,
यामध्ये बसलेली भाग्यश्री ही विद्यार्थिनी रिक्षातून बाहेर फेकली गेली. मुख्य रस्त्यावर असलेल्या रिक्षातून बाहेर पडल्याने भाग्यश्री सर्विस रस्त्यावर आपटली. यामुळे तिला गंभीर दुखापत झाली होती.
त्याचबरोबर रिक्षात तिच्यासोबत असलेली तिची मैत्रीण ऐश्वर्या जगन्नाथ सोडगी वय वर्षे १९ ही या अपघातात गंभीर जखमी झाली आहे. दरम्यान भाग्यश्री ही शहरातील गांधीनाथा कनिष्ठ महाविद्यालयाची सायन्सची विद्यार्थिनी होती.
0 Comments