सांगोला तालुक्यात दुष्काळी सवलतींची तातडीने अंमलबजावणी करावी - डॉ. अनिकेत देशमुख
सांगोला (प्रतिनिधी):- यंदा अपुरा पाऊस झाल्यामुळे सांगोला तालुक्यात दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत.
सांगोला तालुका हा दुष्काळी तालुका जाहीर करण्यात आला आहे.
मात्र दुष्काळी सवलती कधी लागू होणार, असा प्रश्न उपस्थित करुन शासनाने दुष्काळी सवलतीची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी शेकाप नेते डॉ. अनिकेत देशमुख यांनी केली आहे.
सांगोला तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. शासनाकडून सांगोला तालुक्याचा समावेश 'गंभीर' स्वरूपाच्या दुष्काळी तालुक्यांच्या यादीत झाला आहे.
गंभीर स्वरूपाच्या दुष्काळी यादीत सांगोला तालुक्याचा समावेश झाल्यामुळे शासनाद्वारेबेथील जनतेला वेगवेगळ्या सवलती देण्यात येत असतात. परिणामी या भागातील शेतकरी,
विद्यार्थी व नागरिकांना विशेष सवलती लागू होतात. मात्र दुष्काळी घोषणा होऊनदेखील आवश्यक त्या सवलती मिळत नसल्याने शासनाची घोषणा मृगजळ ठरली असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.
अनेक भागातील पेरा वाया गेला, उत्पन्न घटले असून यासाठी आर्थिक मदत किती मिळणार याची शेतकऱ्यांना उत्सुकता आहे. दुष्काळाच्या काळात शेतकरी कामगार पक्ष सदैव शेतकऱ्यांसोबत राहणार आहे.
जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू चीजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी,
आवश्यक तेथे टँकरने पाणीपुरवठा, टंचाई जाहीर केलेल्या गावातील वीज कनेक्शन खंडित न करणे आदी उपाययोजना लवकरात लवकर राबवाव्यात, अशी मागणी शेकाप नेते डॉ. अनिकेत देशमुख यांनी केली आहे.


0 Comments