मोठी बातमी..पंतप्रधान मोदींकडून देशातील 80 कोटी लोकांना दिवाळी गिफ्ट, 5 वर्षे मिळणार मोफत रेशन
दिवाळीचा सण काही दिवसांवर आला आहे. त्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील करोडो गरीब जनतेला मोठं दिवाळी गिफ्ट दिलं आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मोफत रेशन योजनेचा कालावधी
पुढील पाच वर्षासाठी वाढवण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्यामुळं आता देशातील 80 कोटी लोकांना पुढील पाच वर्ष मोफत रेशन मिळणार आहे.
कोरोना महामारीनंतर केंद्र सरकारनं पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना सुरू केली होती. कोरोना महामारीनंतर लॉकडाऊनसह अनेक कडक निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं होतं. विशेषत: गरिबांना खाण्यापिण्याच्या संकटाचा सामना करावा लागला.
अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं गरीब लोकांच्या मदतीसाठी मोफत रेशन योजना सुरु केली होती. 80 कोटी देशवासी या योजनेचा लाभ घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पाच किलो गहू किंवा तांदूळ मिळतो. लाभार्थ्यांना हे धान्य मोफत मिळते. केंद्र सरकारने सर्वप्रथम 30 जून 2020 रोजी याची सुरुवात केली होती.
त्यानंतर अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. सध्या ही योजना डिसेंबर 2023 मध्ये म्हणजेच पुढील महिन्यात संपणार होती. आता 5 वर्षांच्या मुदतवाढीनंतर, लोकांना डिसेंबर 2028 पर्यंत या योजनेचा लाभ मिळणार आहे.
0 Comments