मोठी बातमी...
आरोग्य यंत्रणा कधी होणार तंदुरुस्त?
हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना प्रत्येक तालुक्यात, तेथे रुग्णांची केवळ तपासणीच
सोलापूर : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आरोग्याच्या सुविधा तालुक्याच्या ठिकाणीच मिळाव्यात या हेतूने फेब्रुवारी २०२३पासून प्रत्येक तालुक्यात 'हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' सुरु करण्याचा निर्णय झाला.
सोलापूर जिल्ह्यात मे महिन्यापासून दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर हे शहराजवळील तालुके वगळून उर्वरित नऊ तालुक्यांमध्ये हा दवाखाना सुरु झाला, पण अद्याप केवळ रुग्णांच्या तपासणीपुरतेच हे दवाखाने त्याठिकाणी असल्याची वस्तुस्थिती आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, बार्शी, माढा (कुर्डुवाडी), माळशिरस, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर, सांगोला व करमाळा या नऊ तालुक्यांमध्ये आपला दवाखाना उघडण्यात आला आहे.
आतापर्यंत मे ते सप्टेंबर या पाच महिन्यात आपला दवाखान्यांमध्ये त्या त्या तालुक्यातील २८ हजार ८६० रुग्णांनी वेगवेगळ्या पद्धतीची आरोग्य तपासणी करून घेतली आहे.
तसेच दवाखान्यांमधील प्रयोगशाळेच्या माध्यमातून चार हजार ५२ रुग्णांनी रक्तासह इतर तपासण्या करून घेतल्या आहेत. तर ५९२ गरोदर महिलांनीही आपले दवाखान्यातूनच तपासणी केली आहे.
हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हा त्या तालुक्यातील सर्वच प्रकारच्या रुग्णांसाठी आधार बनावेत या हेतूने त्याची सुरवात झाली. कारण, यापूर्वी ग्रामीण भागात उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालये,
आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे असतानाही विद्यमान राज्य सरकारने फेब्रुवारीमध्ये हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अद्याप तपासणी करण्यापलीकडे त्याठिकाणी काहीच होत नाही, असे चित्र आहे.
लवकरच आपला दवाखान्यात स्पेशालिस्टची नेमणूक
सोलापूर जिल्ह्यात नऊ तालुक्यांमध्ये मे २०२३ पासून हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करण्यात आला आहे. त्याठिकाणी काही दिवसांत स्पेशालिस्ट डॉक्टर्स (स्त्रीरोग, अस्थिरोग, बालरोग तज्ज्ञ) नेमून त्यांना आठवड्यातील एक दिवस ठरवून
त्या त्या आजाराच्या रुग्णांना बोलावून त्यांची तपासणी केली जाईल. त्यानंतर ज्यांना शस्त्रक्रिया किंवा अन्य काही उपचाराची गरज लागेल, त्यांना महात्मा फुले जनआरेाग्य योजनेतील रुग्णालयांमधून उपचार मिळतील.
- डॉ. संतोष नवले, जिल्हा आरोग्याधिकारी, सोलापूर
...तरीही सर्वोपचार रुग्णालयावरच भार
छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील (सिव्हिल हॉस्पिटल) खाटांची क्षमता ७६३ एवढीच आहे, पण ग्रामीण भागातील बहुतेक रुग्ण उपचारासाठी याच ठिकाणी दाखल होतो. परराज्यातील व परजिल्ह्यातील रुग्ण देखील येथेच येतात. त्यामुळे नेहमीच सर्वोपचार रुग्णालयात एक हजारांवर रुग्ण असतात.
'आपला दवाखान्यात'ही तपासणीशिवाय काहीच होत नसल्याने तेथील रुग्णालाही सर्वोपचार रुग्णालयातच पाठविले जात आहे. त्यामुळे जोपर्यंत जिल्हा रुग्णालय सुरु होत नाही, तोपर्यंत सर्वोपचार रुग्णालयावरील भार कमी होणार नाही, अशी सद्य:स्थिती आहे.
0 Comments