सोलापूर जिल्ह्यात ६ महिन्यात ५२३ शिशू-बालमृत्यू!
बार्शी, माढा, मोहोळ, पंढरपूरमध्ये सर्वाधिक जास्त; आठ मातांचाही मृत्यू
सोलापूर : माता, शिशू व बालमृत्यू रोखण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात. परंतु,
गर्भवती मातांकडून स्वतः बरोबरच बाळाची व्यवस्थित काळजी घेतली जात नाही. त्यामुळे शिशू व बालमृत्यूचे प्रमाण अद्याप कमी झालेले नाही.
सोलापूर जिल्ह्यात मागील सहा महिन्यात २४५ शिशू (एक वर्षाखालील) व २७८ बालमृत्यू (५ वर्षांखालील) झाले आहेत. त्यात बार्शी, माढा, मोहोळ व पंढरपूर या तालुक्यात सर्वाधिक प्रमाण आहे.
राज्यातील बालविवाहाचे प्रमाण अजूनही कमी झाले नसून, टॉप-५ जिल्ह्यांच्या यादीत सोलापूर देखील आहे.
अनेकदा मुलीची शारीरिक वाढ पूर्ण झालेली नसतानाही तिच्या इच्छेविरुद्ध विवाह लावून दिला जातो. त्याच मुलींना पुढे गर्भासंदर्भातील गंभीर आजारांना तथा समस्यांना तोंड द्यावे लागते.
दुसरीकडे अद्याप ग्रामीण भागात आरोग्याच्या पूर्णपणे सुविधा मिळत नाहीत. रुग्णालयात वेळेत पोचण्यातील अडचणी दूर झालेल्या नाहीत.
१ एप्रिल ते ३० सप्टेंबर या काळात सोलापूर जिल्ह्यात एक वर्षांखालील २४५ शिशुंचा तर पाच वर्षांखालील २७८ बालकांचा मृत्यू झाला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मनीषा आव्हाळे यांनी पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी या बाबींकडे गांभीर्याने लक्ष दिले जात आहे.
हे प्रमाण शून्यावर करण्यासाठी त्यांचा प्रयत्न असून, त्यादृष्टीने आरोग्य विभागाचे अधिकारी आता तालुकानिहाय बैठका घेत आहेत.
बालमृत्यूची प्रमुख कारणे
- वजन कमी असल्याने ९५ मृत्यू
- श्वास घेण्याच्या समस्येमुळे ३३ मृत्यू
- न्युमोनियामुळे १८ जणांचा मृत्यू
- जन्मजात आजारामुळे १४ तर अन्य कारणांमुळे ८७ मृत्यू
तालुकानिहाय शिशू व बालमृत्यू
तालुका शिशूमृत्यू बालमृत्यू
अक्कलकोट ७ १०
बार्शी ३७ ४०
करमाळा १२ १८
माढा २८ ३०
माळशिरस १६ १८
मंगळवेढा २२ २३
मोहोळ ३७ ३९
पंढरपूर ४३ ४८
सांगोला १६ ११
उत्तर सोलापूर ८ ९
दक्षिण सोलापूर २४ २७
एकूण २४५ २७८
गर्भवती मातांच्या मृत्यूमध्ये घट
सोलापूर जिल्ह्यातील गर्भवती मातांचे मृत्यू कमी करण्यात जिल्हा परिषदेला यश आले आहे. मागील सहा महिन्यात दक्षिण सोलापूर, मंगळवेढा, सांगोला, माढा,
माळशिरस व पंढरपूर तालुक्यात प्रत्येकी एक तर अक्कलकोट तालुक्यातील दोन गर्भवती मातांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागात झाली आहे.
मृत्यू वाढण्यास बालविवाह हे प्रमुख कारण
१ एप्रिल ते २० ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात जवळपास ४५ बालविवाह रोखण्यात आले आहेत.
दरवर्षी सरासरी ६० बालविवाह रोखले जातात. हे प्रमाण मागील तीन वर्षांतील आहे.
जिल्हा बालसंरक्षण कक्षाकडून ही कारवाई केली जाते. अनेक कारवायांत १८ वर्षांखालील मुली गर्भवती असल्याचेही आढळून आले आहे.
त्या बालिकांमध्ये बाळाचे वजन, लोह कमी आणि शारीरिक वाढ अपूर्ण अशा समस्या आढळल्या आहेत.
शिशु-बालमृत्यू करण्याचा प्रयत्न
शासनाच्या वतीने जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना, मोफत तपासणी, सोनोग्राफी अशा सुविधा गर्भवती मातांना दिल्या जातात.
पण, अनेकदा गर्भवती मातांच्या निष्काळजीसह प्रसुतीनंतर बाळाचे वजन, श्वसनाचा त्रास, न्युमोनिया अशा आजारांमुळे शिशू व बालमृत्यू होतात.
हे प्रमाण कमी करण्यासाठी शासकीय योजना व जनजागृतीसाठी गावोगावी प्रचार-प्रसिद्धी, लसीकरणावर भर दिला जात आहे.
- डॉ. संतोष नवले, जिल्हा आरोग्याधिकारी, सोलापूर


0 Comments