मोठी बातमी...“अजित पवारांमुळे सांगोल्यात माझा मार्ग मोकळा” -
आ. शहाजीबापू पाटलांमध्ये उत्साह संचारला दीपकआबांबाबतही केला गौप्यस्फोट
अजित पवार यांच्या यांनी अख्खी राष्ट्रवादी काँग्रेस घेऊन भाजप, शिवसेनेच्या सरकारमध्ये एन्ट्री केल्याने “काय झाडी.. काय डोंगार… काय हाटील..” फेम आमदार शहाजीबापू पाटील यांची नेमकी काय प्रतिक्रिया असेल
याची अख्ख्या महाराष्ट्राला उत्सुकता होती. अखेर बापूंनी याबाबत आपली भूमिका मांडत सर्वांना धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह आणि नाव हे अजित पवारांनाच मिळेल.
अजित पवारांच्या एन्ट्रीमुळे सांगोल्यात माझा मार्ग मोकळा झाला असल्याचे विधान त्यांनी पंढरपूर येथे पत्रकारांशी बोलताना केले आहे. साम टीव्हीने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मागील आठवड्यात भाजप, शिवसेना सरकारमध्ये सहभागी होण्याचा अचानक निर्णय घेतला आणि महाराष्ट्रात खळबळ उडाली.
त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अगदी मागील आठवड्यापर्यंत भाजप, शिवसेना नेते आपला विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीवर आणि पर्यायाने अजित पवार यांच्यावर सडकून टीका करत होते.
त्यात शिवसेनेचे वजनदार आमदार शहाजीबापू पाटील अग्रभागी होते. बापूंनी अगदी शेलक्या शब्दांत अजित पवार यांच्यावर यापूर्वी टीका केली होती.
आता खुद्द अजित पवार हेच भाजप, शिवसेनेच्या सरकारमध्ये सहभागी झाल्याने आमदार शहाजीबापू पाटील यांची गोची होईल. बापू नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे मजेशीर होते.
पंढरपूर येथे आमदार शहाजीबापू पाटील यांना पत्रकारांनी गाठले आणि त्यांना सरकारमधील अजित पवारांच्या एन्ट्रीबाबत विविध प्रश्न विचारून बोलते केले.
आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले की, “सध्याच्या राजकीय घडामोडीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाची कायदेशीर बाजू भक्कम दिसते. त्यामुळे राष्ट्रवादीचे चिन्ह घड्याळ आणि पक्षाचे नाव हे दोन्ही अजित पवार गटालाच मिळेल.”
महाराष्ट्र राज्याच्या सत्तेमध्ये अजित पवार यांचा गट सहभागी झाल्यामुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी नसल्याचेही आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
सांगोल्यात माझा मार्ग मोकळा
सांगोला विधानसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दीपकआबा साळुंखे पाटील
यांनी शहाजीबापू पाटील यांना मदत केली होती. या ताकदीच्या जोरावर आमदार शहाजीबापू पाटील हे शेकापच्या अनेक वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावून निवडून आले होते.
आता अजित पवार यांच्या गटात दीपकआबा साळुंखे पाटील यांनी प्रवेश केल्याने शहाजीबापूंची नेमकी काय भूमिका असेल याची उत्सुकता होती. त्यावरही शहाजीबापूंनी भाष्य केले आहे.
शहाजीबापू म्हणाले की, सत्तेमध्ये राष्ट्रवादी सहभागी झाल्याने सांगोला विधानसभा मतदारसंघांमध्ये माझा मार्ग आता मोकळा झाला आहे.
राष्ट्रवादीचे दीपकआबा साळुंखे-पाटील, कल्याणराव काळे हे देखील आता माझ्या व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपला विजय पक्का असल्याचेही यावेळी शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
नेमके काय घडणार?
आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी मागील विधानसभा निवडणुकीत बापूंना पाठिंबा देवून निवडून आणले असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीत ते बापूंना मदत करतील का?
हा प्रश्न आहे. कारण अनेक पंचवार्षिक निवडणुकांत राष्ट्रवादीने शेकापला पाठिंबा दिल्याने दीपकआबा साळुंखे-पाटील यांची तीव्र इच्छा
असूनही त्यांना निवडणूक लढवता आली नव्हती. यावेळेस मात्र त्यांचे कार्यकर्ते आर या पारच्या भूमिकेत आहेत. यंदाच्या निवडणुकीत दीपकआबा साळुंखे-पाटील यांनाच आमदार करायचे असा चंग त्यांनी बांधला आहे.


0 Comments