माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील अजित दादांच्या व्यासपीठावर
तर बहीण जयमालाताई गायकवाड शरद पवारांच्या गटामध्ये दाखल
राज्यातील काका पुतण्याच्या संघर्षाची सांगोल्यात बहीण-भावांनाही झळ
सांगोला, तालुका प्रतिनिधी : (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला)
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील हे आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या व्यासपीठावर तर त्यांची सख्खी बहीण महिला
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष व सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयमालाताई गायकवाड या शरद पवार यांच्या गटात सामील झालेल्या दिसून आल्या.
अर्थातच राज्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या काका पुतण्याच्या सत्ता संघर्षाची झळ आता
सांगोल्यात बहीण भावांनाही लागल्याने राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

राज्यात राष्ट्रवादीमध्ये पक्षांतर्गत वेगवेगळ्या भूमिका घेतल्याने काकापासून पुतण्यांनी फारकत घेऊन
भाजप शिवसेनेबरोबर सत्तेत सामील झाले आहेत. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून त्यांचे पुतणे अजित पवार यांनी
राष्ट्रवादी पक्षांतर्गत बंडाचे दंड थोपटून आपली वेगळी भूमिका घेतली. विरोधी पक्षनेते पदावरून ते थेट राज्याचे उपमुख्यमंत्री झाले.
परंतु घरामध्येच फूट पडल्याने राष्ट्रवादी अंतर्गत बंडाळी उफाळून आली. या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये वेगवेगळे गट राज्यभर निर्माण झाले आहेत.
बुधवार दि ५ रोजी राष्ट्रवादी मधीलच काका व पुतण्यांच्या दोन वेगवेगळ्या बैठका सुरू झाल्या. अनेक आमदार, माजी आमदार, खासदार,
पक्षातील पदाधिकारी हे काहीजण काकांकडे तर काहीजण पुतण्यांकडे गेलेले दिसून आले. सोलापूर जिल्ह्याचेही माजी आमदार व
सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले तसेच सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून आठ वर्षे तर ४ वर्षे राज्याचे
उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलेले दीपक आबा साळुंखे पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या व्यासपीठावर बसलेले दिसून आले
तर त्यांची सख्खी बहीण राष्ट्रवादी महिला प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष व सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राहिलेल्या
जयमालाताई गायकवाड या मात्र शरद पवार यांच्या गटामध्ये सामील झाल्या आहेत. राष्ट्रवादीमधील वरिष्ठ नेत्यांच्या घरामध्ये वेगळ्या
भूमिका घेतलेल्या दिसून आल्या तशीच भूमिका माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्या घरांमध्येही घेतलेली दिसून आली.
१) राज्याप्रमाणे सांगोल्यातही अगोदरच या पॅटर्नची सुरुवात –
या अगोदर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या
वेळी एकीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्षांमध्ये राज्यात आघाडी झाली होती.
परंतु शिवसेनेचे उमेदवार असलेले आमदार शहाजी पाटील यांच्यासाठी माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी वेगळी भूमिका घेऊन शेकापच्या उमेदवाराच्या
विरोधात आमदार शहाजी बापू पाटील यांच्या विजयासाठी जिवाचे रान केले होते. त्यांच्या पाठिंबामुळेच अल्पमतात का होईना शहाजी बापू पाटील आमदार झाले.
त्यामुळे सध्या सेना-भाजप व राष्ट्रवादीची युती झाली आहे तशी यूती या अगोदर सांगोला विधानसभेच्या वेळी व त्यानंतर झालेल्या वेगवेगळ्या
निवडणुकांमध्ये दीपकआबा साळुंखे पाटील व आमदार शहाजी बापू पाटील यांच्या माध्यमातून सांगोल्यातून सुरुवात झाली होती.
२) पवार साहेब आमच्यासाठी आजही दैवतच
अनेक वर्षे पवार साहेबांसोबत माढा लोकसभा आणि सांगोला विधानसभा निवडणुकीत काम पाहिले.
साहेबांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणेच आपण राजकारण आणि समाजकारनात सक्रिय आहोत.
परंतु, आम्ही जी मतदार संघातील जनतेला विकासाची स्वप्ने दाखवली आहेत ती पूर्ण करणे हेदेखील आमचे कर्तव्य आहे.
त्यामुळे मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी अजित दादांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
आमच्यासाठी शरद पवार साहेब हे माझ्यासाठी कायमस्वरूपी दैवतच राहतील ;
माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील


0 Comments