ब्रेकिंग न्यूज ...रक्तदाब वाढला! सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह आवरेना;
५ लाखांची लाच मागणारा सपोनि ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात
सेवा निवृत्तीला काही महिने शिल्लक असतानाच, तब्बल ५ लाख रुपयाची लाच मागितल्याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात अडकले.
संजय मनोहर मोरे (वय ५७) असे त्या लाचेची मागणी करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे.
या घटनेची हकीकत अशी की, दाखल असलेल्या तक्रार अर्जामधील तक्रारदारास सहकार्य करून त्यामध्ये कोणताही गुन्हा दाखल
करण्यासाठी तसेच पोलीस ठाण्यात जमा करून ठेवलेले पिकअप वाहन गाडी सोडवण्यासाठी तक्रारदाराकडून स्वतःसाठी तसेच
विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांच्यासाठी तब्बल पाच लाखांच्या लाचेची मागणी केली.
त्यातील पहिला हप्ता ३ लाख रुपये घेण्यास संमती दर्शविल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहायक पोलिस निरीक्षक संजय मनोहर मोरे याला आज जेरबंद केले.
संजय मोरे याच्याविरूद्ध तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाद मागितली होती. त्या अनुषंगाने बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक,चंद्रकांत कोळी, पोलिस हवालदार शिरीषकुमार सोनवणे, पोलिस नाईक अतुल घाडगे, स्वामीराव जाधव, सलिम मुल्ला, राहुल गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाही मोरे याला लाचेचा मोह आवरला नाही, हे विशेष. त्याला त्याच्या घरातून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.
आरोपीचा वाढला रक्तदाब
घटना घडल्यानंतर आरोपीस न्यायालयात नेत असताना मेडिकल चेक अपसाठी सिव्हीलमध्ये आणले. त्यावेळी त्याचा रक्तदाब वाढला होता.
त्यामुळे त्याला ४१ (१) ड ची नोटीस देऊन सुटका केली आहे. बरे वाटल्यानंतर त्याला अटक केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या सांगण्यानुसार त्यांच्यासाठी व माझ्यासाठी लाच द्यावी लागेल.
असे आरोपपत्रात स्पष्ट म्हटले असून त्यात वरिष्ठाच्या नावाचा उल्लेख आहे. यापूर्वीसुद्धा याच पोलीस ठाण्यात याच अधिकाऱ्याच्या विरोधात असा आरोप झाला होता.


0 Comments