ब्रेकिंग न्यूज... शरद पवार यांनी अखेर भाकरी फिरवली; 'हे' राष्ट्रवादीचे नवे कार्यकारी अध्यक्ष; पवारांची मोठी घोषणा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 24व्या वर्धापनदिनी अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत मोठ्या घोषणा केल्या. प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शरद पवार यांनी ही घोषणा केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यापुढे काम पाहणार आहेत. दोघांकडे देखील वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा या राज्यांची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्याकडे देण्यात आली आहे. प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड या राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्ली येथील वर्धपान कार्यक्रमात शरद पवारांनी ही घोषणा केली आहे. दरम्यान, अजित पवार यांच्यावर कोणतीच जबाबदारी सोपवली नसल्याने त्याची चर्चा सध्या रंगली आहे.
वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीकाही केली. ते म्हणाले की,
‘अनेक राज्यात आज भाजपला दूर ठेवण्याचे काम तिथल्या जनतेने केले आहे. ज्या राज्यात भाजपची सत्ता आलीय तिथे भाजपची सत्ता नव्हती.
आमदार फोडून, त्यांना लालच देऊन सत्ता मिळवण्याचा प्रयत्न भाजपने केला. हे सरकार दिलेली आश्वासने पूर्ण करू शकलेले नाही. देशातील बहुसंख्य राज्यात भाजपविरोधी लाट आहे.
सध्या सर्वाधिक गरज आहे ती म्हणजे वेगवेगळ्या विचारांच्या लोकांनी एका कॉमन प्रोग्रॅमअंतर्गत पुढे यायला हवे.
भारतीय जनता पार्टी अधिकारांचा गैरवापर करत आहे. देशात आज शेतकऱ्यांची परिस्थिती खूप गंभीर आहे. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही. देशातील तरूणांच्यापुढे सर्वात मोठी समस्या बेरोजगारीची आहे.
तरूणांना रोजगाराची संधी मिळत नाही. देशात ९ वर्षांपूर्वी भाजपची सत्ता आली पण जनतेला दिलेली आश्वासन पूर्ण करू शकलेले नाहीत. त्यामुळे देशातील अनेक राज्यांत भाजपचा पराभव होत आहे.
देशात बदल होत आहे. अनेक राज्यांनी भाजपला दूर ठेवलं आहे. देशात परिवर्तन करायच असेल तर संघटन मजबूत करायला पाहिजे.
२३ जून रोजी सर्व विरोधक बिहारमध्ये एकत्र येत आहेत. सर्वांनी मिळून काम करूया आणि देशात परिवर्तन घडवूया, असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.


0 Comments