कर्नाटकातील साध्या वेशातील पोलिसांना मारहाण; प्रकरण सांगोला ठाण्यात,
रात्री उशिरापर्यंत चौकशी पकडायला आले स्वतःच अडकले अटक वॉरंट आहे का म्हणून विचारणा
सांगोला : चेनस्नॅचिंग गुन्ह्यात आरोपीस घेऊन जाण्यासाठी आलेल्या साध्या वेशातील कर्नाटक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आरोपीच्या नातेवाइकांनी चोप दिला.
अखेर मारहाणीच्या भीतीने कर्नाटक पोलिसांनी सांगोला नगरपालिकेत धाव घेतली. स्थानिक पोलिस त्यांना पोलिस स्टेशनला घेऊन गेले. रात्री उशिरापर्यंत कर्नाटक पोलिसांकडे चौकशी सुरू होती.
याबाबत नातेवाइकांनी पोलिसांकडे तक्रारी अर्ज दिला असून, कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. दरम्यान, कर्नाटक पोलिसांना मारहाण झाल्याची चर्चा जोरात रंगली होती.
कर्नाटकात चेनस्नॅचिंग, चोया,दरोडे टाकून चोरीचे सोने आरोपीने महाराष्ट्रातील सराफ व्यावसायिकांना विक्री केल्याचा आरोप करून कर्नाटक पोलिस सांगोल्यातील सराफांवर केला.
त्यांना कायद्याची भीती दाखवून सराफ व्यावसायिकांना त्रास देतात, अशा घटना वारंवार घडल्या आहेत. दरम्यान, कर्नाटकात बल्लारी येथील पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे एक पथक तीन वर्षांपूर्वीच्या चेनस्नॅचिंग
प्रकरणातसांगोल्यातील एका तरुणास घेऊन जाण्यासाठी आले. खासगी वाहनातून साध्या वेशात शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास सांगोल्यात आले होते. त्यावेळी संबंधित तरुणाच्या नातेवाइकांनी कर्नाटक पोलिसांकडे तुमच्याकडे अटक वारंट आहे का,
हा गुन्हा आमच्याच मुलाने केला आहे याबाबत काही पुरावे, कागदपत्रे आहेत का, अशी विचारणा केली. त्यांच्याकडेकोणतीही कागदपत्रे नव्हती. शिवाय ते पाच ते सहा जण साध्या वेशात असल्यामुळे तरुणाच्या नातेवाइकांना संशय आला.
त्यांनी चोप देण्यास सुरुवात केली. यावेळी कर्नाटक पोलिसांनी मारहाणीच्या भीतीने सांगोला नगरपालिकेत धाव घेतली. या घटनेची माहिती सांगोला पोलिसांना मिळताच स्थानिक पोलिस त्यांना पोलिस स्टेशनला घेऊन गेले.
पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी त्यांच्याकडे या आरोपीला घेऊन जाण्यासाठी अटक वॉरंट, कागदपत्र आणले आहेत का, अशी विचारणा केली असता त्यांनी नसल्याचे सांगितले.
पोलिस निरीक्षक यांनी अखेर कर्नाटक पोलिस अधीक्षकांशी या गुन्ह्याबाबत चर्चा, चौकशी केल्यानंतर रात्री उशिरापर्यंत पोलिसांचे जाबजबाब घेण्याचे काम सुरु होते.


0 Comments