बुरा न मानो होली है...! सोलापुरातील नेत्यांची राजकीय धुलवड...!!
सोलापूर शहर अन् जिल्ह्याच्या राजकारणाला 'शिमगा' तसा नवा नाही. इथलं राजकारण नेहमीच चर्चेतलं. इथं नेहमीच पेटते आरोप-प्रत्यारोपांची 'होळी'टीकेची 'धूलवड', सारेच असतात आसुलेले. मग, याच होळीदिनी 'पांढऱ्या खादी'ला आम्ही रंग लावतोय.
सोलापूर शहर आणि जिल्ह्याचं सध्याचं राजकारण गाण्यांमधून मिश्किलपणे सांगायचं झालं तर ते कसे सांगता येईल, कुठलं गाणं, कुठल्या पक्षाला आणि नेत्याला फरफेक्ट मॅच होईल? गाण्यांचे सूर कसे निघतील, या संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट. सोलापूर जिल्ह्यातील राजकीय धूलवड....बुरा न मानो होली है। होळीच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्याच्या सध्याच्या राजकीय प्रवासामधील हे रंग...
सुशीलकुमार शिंदे : (झुठा है तेरा वादा...तेरा वादा...)
सोलापूर शहर-जिल्हावासियांच्या जीवावर दिल्लीच्या तख्खापर्यंत राज केलेले सुशीलकुमार शिंदे हे लोकसभा लढविणार नसल्याचं अनेकदा सांगतात. ते सांगण्याची त्यांनी हॅट्ट्रीक केली आहे. नाही...नाही...
म्हणत सुशीलकुमारांना लोकसभेचा ऐनवेळी मोह काही आवरत नसावा. लोकसभेच्या आखाड्यात ते शड्डू ठोकतातच. सोलापूरकरांच्या जीवावर राजकारण करणारे सुशीलकुमार त्यांच्यापुढेच का वेगळे सांगतात? त्यांची ही भूमिका म्हणजे 'झुठा है तेरा वादा...तेरा वादा'
विजयकुमार देशमुख-प्रकाश वाले (हम तुम दोनों जब मिल जाएंगे... एक नया इतिहास बनाएंगे)
धर्मराज काडादींचे शहर उत्तर मतदारसंघातलं वादळ शमविण्यासाठी चतुर आमदार विजयकुमार देशमुख यांनी लिंगायत समाजामधील 'वजनदार' नेत्यांची मोट बांधणं चालू ठेवलंय.
काँग्रेसचे नेते प्रकाश वाले यांच्याशी त्यांनी सलगी केली आहे. देशमुख आणि वाले आगामी विधानसभेच्या दृष्टीने एकत्र आले असतील तर 'हम तुम दोनों जब मिल जाएंगे... एक नया इतिहास बनाएंगे' या गाण्यामधील ओळीप्रमाणे घडू शकेल.
राजन पाटील (अहो, दाजीबा, असं हे वागणं बरं नव्हं....)
राजन पाटील यांच्या भाजप प्रवेशाचं 'मोहोळ' अद्याप उठलेलंच आहे. पण, पाटील काय त्यावर मोकळ्यापणानं बोलायला तयार नाहीत. मनगटावरील 'घड्याळ' बाजूला करुन 'कमळ' हातात घेण्याचा निर्णय ते कधी तालुक्यातील जनतेवर सोपवतात,
तर भाजपप्रवेशाचा चेंडू कधी आमदार बबनराव शिंदे या त्यांच्या दाजींच्या कोर्टात ढकलतात. त्यांचा भाजप प्रवेश अजूनही संभ्रमावस्थेत आहे. पाटील यांच्याबाबतीतील संभ्रमावस्था आणि 'ऊर्जा' दिलेल्या राष्ट्रवादीशी गद्दारी करण्यावर प्रतिक्रिया उमटताहेत 'अहो, दाजीबा असं हे वागणं बरंं नव्हं.)
रणजितसिंह मोहिते-पाटील-रणजितसिंह नाईक-निंबाळकर : (दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है... जिंदगी भर का गम हमे इनाम दिया है)
माढा लोकसभेची उमेदवारी पदरात पाडून घेण्याच्या महत्वकांक्षेमधून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यातील सख्य बिघडलंय उभतांमध्ये पूर्वीप्रमाणं जिव्हाळा राहिलेला नाही.
'मै बडा..या तू बडा...' असं त्यांच्यात घमासान सुरू आहे. या प्रकरणात दोघांमधील सलोख्याच्या संंबंधांवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे 'दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है..., जिंदगी भर का गम हमे इनाम दिया है' या गाण्याप्रमाणे त्या दोघांची अवस्था असावी.
अभिजित पाटील (तुम अगर साथ देने का वादा करों, मै यूँ ही मस्त नगमें लुटाता रहूँ')
साखर कारखानदारीमधील 'परीस' स्पर्श अभिजित पाटील यांना आता साखरेच्या गोडव्याबरोबरच राजकारणाचा 'गोडवा' चाखावसा वाटू लागला आहे.
आमदारकीच्या सिंहासनासाठी 'कमळ' हुंगायचं की 'घड्याळ' मनगटावर बांधायचं? याबाबत विचारात असलेले पाटील कमळवाल्यांना अन् घड्याळवाल्यांना जणू ग्वाही देत आहेत, 'तुम अगर साथ देने का वादा करों... मै यूँ ही मस्त नगमें लुटाता रहूँ.'
चेतन नरोटे (हम होंगे कामयाब एक दिन... हो हो मन में है विश्वास, पुरा है विश्वास)
सुशीलकुमार आणि प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाच्या वर्तुळातून अनेक मातब्बरांनी काँग्रेसला 'हात' दाखविला. उरलेल्या फौजला घेऊन चेतन नरोटे काँग्रेसची पर्यायाने शिंदे परिवाराच्या नेतृत्वाची ताकद दाखवित आहेत.
नरोटे यांच्या नेतृत्वामधून काँग्रेसला किती 'अच्छे दिन' येतील माहिती नाही. पण काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदाचं सिंहासन साहेब अन् ताईंच्या आशीर्वादानं आपल्याकडे कायम राहील, असा विश्वास 'हम होंगे कामयाब एक दिन, हो हो मन में है विश्वास, पुरा है विश्वास' या गाण्याप्रमाणे नरोटे यांची धारणा असावी.
दीपक साळुंखे (मैं वापस आऊंगा...मैं वापस आऊंगा...)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचं सिंहासन कोणत्याही परिस्थितीत पुन्हा मिळावायचं, असा प्रयत्न सांगोल्याच्या दीपक साळुंखे यांचा आहे, त्यासाठी पडद्यामागून ते खूप काही शिजवतात. खूप खेळ्या खेळतात. प्रसंगी बळिराम साठेंना दवाखान्यात दाखल व्हावं लागतं.
जिल्हाध्यक्षपदासाठी पवार परिवारासह मुख्यत्वे, जयंत पाटील यांच्याकडे सेटिंग असलेल्या साळुंखेंना भरोसा वाटतोय...'मै वापस आऊंगा...मैं वापस आऊंगा...' जिल्हाध्यक्ष पदाची वरमाला गळ्यात पडली, तर कार्यक्रम तर दणक्यात होतील. त्यावेळचं सूत्रसंचालन लय 'देखणं' आणि खुमासदार होणारं बरं.
दिलीप माने (यह जिंदगी कटी पतंग है...)
अत्यंत महत्वाकांक्षी असलेल्या दिलीप माने यांच्याकडे सध्या कोणतचं सन्मानाचं सत्तेमधलं पद नाही. यातून माने हे राजकारणात अत्यंत अस्वस्थ आहेत.
आमदारकीचं सिंहासन मिळविण्यासाठी त्यांचे जोरकस प्रयत्न आहेत. मात्र त्यांच्या राजकारणाची 'दशा आणि दिशा' अस्थिर झाली आहे. आमदारकीसाठी त्यांचा संघर्ष अजून वाढेल, हेच वास्तव असताना 'यह जिंदगी कटी पतंग है' या गाण्याचा अनुभव त्यांना राजकारणाबाबत येतोय.
उमेश पाटील (सरकार तुम्ही मार्केट करता जाम...)
हायप्रोफाईल नेतृत्व उमेश पाटील यांना स्वत:चं आणि राष्ट्रवादी पक्षाचं मार्केट जाम करता येतं. त्यासाठी ते उभ्या राज्यात परिचित आहेत. पण, मोहोळ तालुक्यात लोकप्रतिनिधींनी काय केलं? यावर आगपाखड करणाऱ्या उमेश पाटील यांनाच आता 'तुम्ही काय केलं?' असा सवाल केला जात आहे.
इतरांचं वस्त्रहरण करणारे उमेश पाटील यांचंदेखील वस्त्रहरण आता सुरु झालंय. 'सरकार, तुम्ही मार्केट करता जाम' याप्रमाणं कौतुक होणाऱ्या पाटील यांना स्वत:च्या भावकीपासून 'ईट का जबाब पत्थरसे' याचा प्रत्यय येतोय.
दिलीप सोपल-रश्मी बागल-कोलते (पावणं या गावचं का, त्या गावचं, कुण्या गावचं?)
आमदारकीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर बंद करुन 'जय महाराष्ट्र'चा नारा देत हातात धनुष्यबाण घेतलेले दिलीप सोपल आणि रश्मी बागल-कोलते हे नेते सध्या कोणत्या पक्षात आहेत,
याचा शोध भल्याभल्यांना लागेनासा झाला आहे. या नेतेमंडळींकडून ना शिवसेनेचा गजर होतोय, ना अप्रत्यक्ष घड्याळाचा. 'तेरी भी चूप, मेरी भी चूप, कोणाला काही सांगू नका...कबुल ...कबुल' या गाण्यातील ओळींबरोबरच 'पावणं या गावचं का, त्या गावचं ? कुण्या गावचं?' याचा प्रत्यय येतो.
प्रणिती शिंदे (बोल...बोल...बच्चन...)
काँग्रेसची विस्कटलेली घडी सावरण्यासाठी पक्षामधील सर्वांना एकत्र आणू, असं प्रणिती शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका कार्यक्रमात म्हटलं होतं.
त्यावर काँग्रेसच्या सच्चा आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना दिलासा वाटला होता. पण कशाचं काय? प्रणिती शिंदे आता यावर काहीच बोलायला तयार नाहीत. याचा अर्थ प्रणिती बोलत नाहीत, असं काढू नका बरं. हवं तर आमदार रोहित पवारांना विचारा.
पहिल्याच बॉलवर त्या त्रिफळा कशा उडवतात. प्रणितींच्या बोलण्यानं रोहित यांच्या मनाच्या जखमा अजूण बऱ्या झालेल्या नाहीत बरं. रोहित पवारांच्या छातीवर काकांनी बाम लावल्यामुळं म्हणे तात्पुरता आराम मिळालाय त्यांना. प्रणिती शिंदे यांच्याबाबत 'बोल... बोल..बच्चन...बोल बच्चन' हे गाणं सार्थ ठरणारं.



0 Comments