google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्ह्यातील दोन दिवसात झालेल्या अपघातात पाच जण ठार !

Breaking News

सोलापूर जिल्ह्यातील दोन दिवसात झालेल्या अपघातात पाच जण ठार !

 सोलापूर जिल्ह्यातील दोन दिवसात झालेल्या अपघातात पाच जण ठार !

 सोलापूर जिल्ह्यात दोन दिवसात झालेल्या तीन अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील अपघाताच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.   

अलीकडे सतत अपघात होत असून अपघातांचे प्रमाण वाढू लागल्याची चिंताजनक बाब सतत भेडसावत आहे. पंढरपूर तालुक्यात करकंब येथे उस तोडणी मजुरांचा भयावह अपघात नुकताच झाला होता त्या पाठोपाठ पंढरपूर आणि परिसरात अपघातांची मालिकाच सुरु झाली आहे आणि यात नागरिकांचे प्राण जाताना दिसत आहेत. मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे पिकअपने धडक दिल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. 

भरधाव वेगाने निघालेल्या एका पिकअप वाहनाने चौघांना उडवले. इंडियन ऑईल पंपाजवळ रस्त्याच्या कडेला बोलत थांबलेल्या चौघांना पीकअप ने जोराची धडक दिली आणि यात तिघांचा मृत्यू झाला तर पाच वर्षे वयाची एक चिमुकली मुलगी मात्र सुदैवाने बचावली आहे. 

या अपघातात मोहोळ तालुक्यातील परमेश्वर पिंपरी येतील सोपान तायप्पा भालेराव (वय ५०), जयश्री सोपान भालेराव (वय ४५), उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज येथील कस्तुरा तुकाराम साठे (वय ४०) हे तिघे ठार झाले. पाच वर्षे वयाची प्रज्वली प्रशांत भालेराव ही मुलगी जखमी झाली असली तरी सुदैवाने बचावली आहे. 

या अपघात प्रकरणी पीकअप चालकाला अटक करण्यात आली आहे.   या पिकअप चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन (एम एच १३  सीजे ०६६२)  हयगयीने निष्काळजीपणे चालवून जोराची धडक दिल्याने तिघेजण जागीच ठार झाले. 

या अपघातात पाच वर्षीयप्रज्वली भालेराव ही जखमी झाली  आहे.  भालेराव यांची दुचाकीचे (एमएच १३ डी एल ९६७५)  नुकसान केल्याची फिर्याद मल्हारी तायप्पा पाराध्ये यांनी मंगळवेढा पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पंढरपूर येथे अपघात !

पंढरपूरजवळ दुचाकी आणि क्रुझर जीप यांच्यात झालेल्या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला असून दोघे जखमी झाले आहेत. काल बुधवारी सायंकाळी पंढरपूर - महूद रस्त्यावर कोर्टी गावाजवळ झालेल्या या अपघातात मुंबईतील २८ वर्षे वयाचा परशुराम मोहन लोहोकरे हा तरुण मृत्युमुखी पडला आहे. 

माळशिरस तालुक्यातील खंडाळे येथील उमाकांत गोरख खटके (२८) आणि स्वप्नील गुड्या साळवे (२७) हे दोघे जखमी झाले आहेत. पंढरपूर तालुक्यातील कासेगांव येथे सुरु असलेल्या यात्रेनिमित्त श्री यल्लम्मा देवीचे दर्शन घेऊन मोटारसायकलवरून परत मुंबईला जाताना क्रूझर जीपबरोबर समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. 

कासेगांव येथील श्री यल्लम्मा देवीची यात्रा सुरू आहे असून  या यात्रेनिमित्त देवीच्या दर्शनासाठी मुंबईहून परशुराम लोहकरे हे आपल्या सीबीझेड मोटारसायकलवरून (एम.एच. ०३  सी.वाय. ४१७१) कासेगाव येथे दर्शनासाठी आले होते. 

दर्शन घेऊन बुधवारी सायंकाळी एकाच मोटारसायकलवरून सदर तिघेजण परत निघाले होते.  कोर्टीजवळ  पालवी संस्थेच्या समोरील रस्त्यावर महुदकडून पंढरपूरकडे येत असलेल्या क्रुझर जीप (एम.एच. २९ / आर. २७९१) आणि  मोटारसायकल यांच्यात  समोरासमोर धडक झाली. 

या अपघातात परशुराम लोहकरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले. त्यांच्यावर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर जीप चालक अविनाश उत्तम राठोड (रा. जमशेद, ता. पुसद) हा स्वतःहून  पोलीस ठाण्यात हजर झाला. 

भांडी व्यावसायिक ठार !

पंढरपूर - सांगोला रस्त्यावर झालेल्या एका अपघातात सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील मायणी येथील ५५ वर्षे व्हायचे शहाजी चिनाप्पा पवार हे भांडी व्यावसाईक ठार झाले आहेत. भरधाव वेगाने दुचाकीला कारने समोरून जोरात धडक दिली.

 या अपघातात ५५ वर्षीय भांडी व्यावसायिकाचा ग्रामीण रुग्णालयात उपचारापूर्वी मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास सांगोला- पंढरपूर रस्त्यावर संगेवाडी येथील खंडागळे वस्तीसमोर हा अपघात झाला. शहाजी चिनाप्पा पवार (५५,रा. मायणी, ता. खटाव, जि. सातारा) हे जखमी झाले आणि त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. 

सांगोला पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी इंदापूर तालुक्यातील नीर निमगाव येथील कारचालक अक्षय बाळासाहेब शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पवार व त्यांचा भाऊ शहाजी पवार हे दोघेजण मिळून कुटुंबासह सांगोल्यात शिरभावीजवळ मेटकरवाडी येथे राहतात. 

त्यांचा भंगार गोळा करण्याचा व भांडी विक्रीचा व्यवसाय आहे. नवीन भांडी खरेदीसाठी सांगोला व पंढरपूर येथे त्यांना जावे लागत होते. भाऊ शहाजी पवार हा त्याच्या दुचाकी (एम. एच. ११ / डी.सी.५१३१) वरून भांडी घेऊन पंढरपूर-सांगोल्याकडे निघालेला असताना संगेवाडीजवळ खंडागळे वस्ती दरम्यान हा अपघात झाला.

 सांगोल्याकडून चुकीच्या दिशेने निघालेल्या (एमएच ४५ / एडी ०१६५) कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या शहाजी पवार यास उपचाराकरिता सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यूझाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

Post a Comment

0 Comments