सांगली जिल्ह्यातून चोरलेली ३५ गाढवे सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यात पोलीस तपासात उघड...
सांगोला:- गाढवांनाही पळवणारी टोळी उघडकीस आली असून सांगली जिल्ह्यातून चोरलेली ३५ गाढवे सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यात बांधून ठेवली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
वेगवेगळ्या प्रकारे चोऱ्या होतात आणि चोऱ्या करण्यासाठी चोर नवनवे फंडे अवलंबतात हे देखील अनेकदा समोर आले आहे. चोर गुन्हेगारांच्या वेगवेगळ्या टोळ्यावर पोलीस कारवाई करतात आणि त्यांच्याकडून मोठा मुद्देमाल देखील जप्त करतात. परंतु गाढवांची चोरी करणारी मोठी आणि आंतरराज्य टोळी उघडकीस आली असून पोलिसांनी त्यांची पाळेमुळे खणून काढली आहेत. गाढवांना पळवून नेऊन त्यांची विक्री करणारी एक जणांची टोळी सांगली पोलिसांनी पकडली आहे.
कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यातील तेरदाळ येथील रमेश परशू बजंत्री (वय २४), संगाप्पा उर्फ बाळू यमनाप्पा बजंत्री (वय २६), बाळाप्पा उर्फ यमनाप्पा बजंत्री (वय २५) व लक्ष्मण स्वामी गाणगेळ (वय ३२) या चौघांना नुकतीच अटक करण्यात आली होती आणि त्यांना आता जामीनही मिळाला आहे.
पोलिसांनी केलेल्या तपासात या टोळीने पंधरा दिवसांपूर्वी सांगलीतून चोरलेली ३५ गाढवे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे बांधून ठेवलेली असल्याची माहिती समोर आली आहे. चौघांना जामीन झाला असला तरी गाढवे पळवून नेण्यासाठी वापरला गेलेला टेंपो जप्त करण्यात आलेला असून तो पोलिसांनी अटकावून ठेवलेला आहे.
सांगलीतील गावभाग परिसरातून गाढवे चोरून ती टेम्पोत भरून नेली जात असताना गाढवांच्या मालकांनी रंगेहात पकडले होती आणि त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. सांगली परिसरात गाढवे चोरून ती हैद्राबाद आणि आंध्र प्रदेशात विकत होते. ही गाढवे चीनला पाठवली जातात अशी माहिती मिळाली आहे. गाढव विकणारी टोळी एका गाढवामागे ३५ ते ४० हजार रुपये मिळवतात अशी माहितीही पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे.
सांगलीत चोरलेली गाढवे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात बांधून ठेवली असल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली असून ही गाढवे ताब्यात घेण्याच्या हालचाली पोलिसांनी सुरु केल्या आहेत. गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला टेंपो कुणाच्या नावावर आहे याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाकडून मागविण्यात आली आहे.
0 Comments