भाजपचा चक्रव्युह भेदणार कोण? काँग्रेसकडून 'शिंदेसाहेबां'ना मैदानात उतरण्यासाठी गळ
२०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला आणि काँग्रेस केवळ एकाच मतदारसंघापुरती राहिली. आता काळ बदलला, पक्षनिष्ठेची माळ खुंटीला लटकली.सत्तेसाठी वेगवेगळे राजकीय डावपेच खेळले जावू लागले. भाजपकडून आता सोलापूर जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघ काबिज करण्याचा चक्रव्यूह तयार केला जात आहे.
अशा परिस्थितीत आमदार प्रणिती शिंदे या एकमेव आमदाराला तो चक्रव्यूह भेदणे कठीण जाणार आहे. त्यासाठी पुन्हा साहेबच (माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे) तारणहार ठरतील, असे मत काँग्रेस नेत्यांचे आहे. त्यांनी साहेबांना राजकीय मैदानात उतरण्याची गळ घातली आहे.
जिल्ह्यात एकेकाळी नामदेवराव जगताप व शंकरराव मोहिते-पाटील या दोन गटाचेच वर्चस्व होते. त्यांच्याशिवाय कोणत्याही राजकीय पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संधीसुध्दा मिळत नव्हती.
१७७२ मध्ये जिल्ह्यातील सांगोला वगळता १२ मतदारसंघांवर काँग्रेसचेच वर्चस्व होते. १९७२ च्या दुष्काळात विजयसिंह मोहिते-पाटलांनी खूप मेहनत घेतली. त्यांना जिल्हा परिषदेत मोठी जबाबदारी मिळाली. पण, काँग्रेस फुटली आणि १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. त्यानंतर हळूहळू जिल्ह्यातील काँग्रेसला घरघर लागली.
तरीपण,काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत वरिष्ठ स्तरावरून शरद पवार तर जिल्ह्यात सुशीलकुमार शिंदे यांच्या समन्वयातून राजकीय वाटचाल सुरु होती. महापालिकेवर काँग्रेसचा महापौर तर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा अध्यक्ष, अशी वाटचाल २०१४ पर्यंत सुरु होती. मोदी लाटेत २०१४ मध्ये राज्यात व केंद्रात सत्तांतर झाले आणि नव्या राजकीय डावपेचाला सुरवात झाली.
अनेकांनी पक्षनिष्ठेची माळ खुंटीला अडकवली आणि पाण्यात उड्या घ्याव्यात, तसे पक्षांतर केले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या तुलनेत काँग्रेसची अवस्था फार दयनीय झाली. वरिष्ठ नेत्यांचे दुर्लक्ष, स्थानिक पातळीवरील पक्षांतर होत असतानाच लोकसभेला दोनदा पराभव झाल्याने साहेबांनी राजकारणापासून निवृत्तीची घोषणा केली.
त्याच संधीचा फायदा उठवत भाजपने जिल्हा काबिज करण्याचा डाव टाकला. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी सातत्याने सोलापूर दौरे सुरु केले. काँग्रेसमध्येही जुने-नवा वाद निर्माण होत आहे. अशावेळी काँग्रेसची ताकद टिकवून आमदार प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वाला बळ देण्यासाठी साहेबांनामैदानात यावेच लागेल, अशी स्थिती आहे.
...तर झेडपी, महापालिकेवर विरोधकांची सत्ता
महाविकास आघाडी सरकार असताना तिन्ही पक्षांनी मिळून भाजपला टार्गेट करण्याऐवजी शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीतील नेत्यांनी एकमेकांवरच कुरघोडी केली. दरम्यान, १९९७ मध्ये महापालिकेत काँग्रेसचे ६४ नगरसेवक होते. झेडपीत देखील काही समित्यांवर काँग्रसेला संधी होती. महापालिकेत कधीच काँग्रेस नगरसेवकांची संख्या ४०पेक्षा कमी झाली नाही.
पण, २०१७ च्या निवडणुकीत १०२ पैकी केवळ १४ जागांवरच काँग्रेसला यश मिळाले. राष्ट्रवादीलाही मोठा फटका बसला. आता तर अडीच वर्षांतच राज्यातील महाविकास आघाडी सरकार गेले. महाविकास आघाडीवेळी पक्षांतर केलेले किंवा पक्ष बदलण्याच्या तयारीतील डिस्टर्ब स्थानिक नेत्यांना आपल्याकडे घेण्याची तयारी भाजप व शिंदे गटाने सुरु केली आहे.
भाजप व शिंदे गटाचा डाव यशस्वी झाल्यास महापालिका, जिल्हा परिषदेसह बहुतेक स्थानिकस्वराज्य संस्थांवर भाजप, शिंदे गटाचेच वर्चस्व राहील, असा अंदाज राजकीय तज्ज्ञ वर्तवू लागले आहेत. त्यामुळे काँग्रेसला अडचणीतून बाहेर काढून विरोधकांचा चक्रव्यूह भेदण्यासाठी साहेबांनाच मैदानात उतरावे लागणार आहे.
0 Comments