google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी सर्वंकष वाळू धोरण राबविणार पालक मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील

Breaking News

अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी सर्वंकष वाळू धोरण राबविणार पालक मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील

 अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी सर्वंकष वाळू धोरण राबविणार पालक मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील

अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीची कायम स्वरूपाची कीड समूळ नष्ट करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. 

यासाठी नाशिक विभागाचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करून राज्याचे सर्वंकष वाळू उपशाचे धोरण लवकरच ठरविण्यात येणार आहे.त्यासाठी आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा आदी राज्यातील वाळू धोरणाचा अभ्यास करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री व पालक मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी  येथे दिली.

मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील मंगळवारी (ता.४) विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपूरला होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पंढरपूर शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सुरु असलेल्या अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविषयी विचारले असता, 

त्यांनी यापुढे अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीच्या तक्रारी आल्या तर संबंधित विभागातील तहसीलदार, सर्कल आणि तलाठी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल, असा इशारा दिला.राज्यात अनेक ठिकाणी अधिकृत आणि अनधिकृतपणे वाळू उपसा सुरु आहे. यामध्ये सर्व स्तरावर अनेक लाभार्थी आहेत. त्यामुळे अवैध वाळू उपशाच्या घटना सुरु आहेत. 

त्यामुळे सामाजिक वातावरण बिघडले आहे. सामाजिक शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अवैध वाळू उपसा रोखण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अवैध उपशाची लागलेली ही कीड समूळ नष्ट करण्यासाठी राज्य सरकारने सर्वंकष वाळू उपशाचे धोरण तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. 

नाशिक विभागाचे आयुक्तराधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली जाणार आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर राज्यातील वाळू घाटाच्या लिलावाचे धोरण ठरविण्यात येणार आहे. तो पर्यंत अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर नियंत्रणठेवण्याच्या सूचना महसूल आणि पोलिस प्रशासनाला दिल्या आहेत. 

ज्या भागात असे अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीचे प्रकार सुरु असतील अशा विभागातील तहसीलदार, सर्कल आणि तलाठ्यांना जबाबदार धरुन त्यांच्यावर निलंबनाची कडक कारवाई केली जाईल. अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी प्रत्येक जिल्हा पोलिस प्रमुखांनाही वाळू माफियांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्याचेही मंत्री विखे-पाटील यांनी सांगितले.

यावेळी प्रशांत परिचारक, चेतनसिंह केदार, खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार शहाजी पाटील, आमदार राम सातपुते, जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील, राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके, कल्याणराव काळे, धनंजय काळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.विकास आराखड्याबाबत बैठक

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासंदर्भात आपण लवकरच पंढरपुरातील स्थानिक नागरिकांसोबत एक बैठक घेऊन त्यामध्ये विकास आराखड्यावर सविस्तर चर्चा केली जाईल असे आश्वासन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.मराठा आरक्षणासंदर्भात लवकरच बैठक

मराठा आरक्षणासह सर्वच आघाड्यांवर महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा मराठा आणि ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात लवकरच एक बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments