सांगोला महिला व बाल अन्याय अत्याचार विरोधी कार्यशाळा संपन्न.. न्याय मिळवून देण्यात शासकीय यंत्रणांचा नेहमीच पुढाकार : सांगोला पो. नि.अनंत कुलकर्णी
सांगोला/प्रतिनिधी : महिला आणि बालकांच्या अन्याय अत्याचार केसेस मध्ये पीडितांना न्याय मिळावा यासाठी पोलीस प्रशासन व अन्य शासकीय यंत्रणांचा नेहमीच पुढाकार राहिला असून महिला आणि मुलांना सुरक्षित ठेवणारे अनेक कायदे शासनाने केले असून त्याची जाणीव जागृती व अंमलबजावणी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे मत सांगोल्याचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी मांडले.
ते डॉ.आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था, मैत्री नेटवर्क आणि निर्माण बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने आयोजित महिला व बालकांवरील अन्याय अत्याचार आणि शासकीय यंत्रणांची भूमिका या विषयावरील कार्यशाळेत बोलत होते.
यावेळी मैत्री नेटवर्कचे ओंकार रामतीर्थकर, ॲड.राजेश्वरी केदार, सुवर्णा गाडेकर, सहाय्यक गट विकास अधिकारी विकास काळूखे, महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी आसमा आतार, कार्यक्रम समन्वयक कल्पना मोहिते, संरक्षण अधिकारी सचिन चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे, ॲड. प्रभा यादव, स्वातीताई मगर, शर्मिला केदार, बाबा बनसोडे आदी उपस्थित होते.
पो.नि. कुलकर्णी पुढे बोलताना म्हणाले, दिवसेंदिवस महिला व मुलांवरील अन्याय अत्याचार वाढत आहेत. अनेक महिला त्यांच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या कायद्या बाबत अज्ञान आहेत. पोक्सो कायदा, घरगुती हिंसाचार विरोधी कायदा असे अनेक कायदे मोठ्या प्रमाणात महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी आहेत. या कायद्यांचा प्रचार प्रसार करण्याची जबाबदारी शासकीय यंत्रणे सोबत समाजातील विविध घटकांची असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यशाळेचे प्रास्ताविक कल्पना मोहिते यांनी केले. त्यांनी आपल्या कार्यशाळेत महिला व बालकांवरील अन्याय अत्याचार व शासकीय यंत्रणांची भूमिका काय असावी व का? गरजेची आहे याची माहिती दिली. व कार्यशाळेचा उद्देश समजून सांगितला.
यावेळी ॲड.राजेश्वरी केदार यांनी महिलांवरील होणारे लैंगिक अत्याचार आणि त्यांच्या संरक्षणासाठी असणाऱ्या विविध कायद्यांची माहिती दिली. कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक छळ, विशाखा समिती या बाबत माहिती दिली. समाजात महिलाप्रती सन्मान निर्माण झाल्यास या अन्याय अत्याचाराच्या घटना खूप कमी होतील असेही त्यांनी सांगितले.
संरक्षण अधिकारी यांनी मिशन वात्सल्य व पिडीत महिलांना मदत मिळवून देणाऱ्या अन्य योजनांची माहिती दिली. मिशन वात्सल्य योजने अंतर्गत कोरोना काळात मयत झालेल्या पालकांच्या मुलांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे काम विभागामार्फत करण्यात आले
असून एक पालकत्व गेले आहेत अशांना हि आर्थिक मदत मिळवून देण्याचे काम करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मैत्री नेटवर्कचे ओंकार रामतीर्थकर यांनी उपस्थित महिलांशी महिलांच्या विविध प्रश्न आणि समस्या याबाबत संवाद साधला.
यावेळी ॲड.प्रभा यादव म्हणाल्या, आजकालच्या महिला विविध ताण तणावाखाली जगत आहेत. यातूनच त्या अन्याय अत्याचाराला बळी पडतात. ताण तणावाखाली माहिला बोलत नाहीत. यासाठी महिलांना ताण तणाव मुक्त करणे गरजेचे असून शासकीय यंत्रणा सोबतच विविध संस्था संघटना यांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी वन स्टॉप सेंटरच्या सुवर्णा गाडेकर यांनी वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून अत्याचारित महिलांना मिळणाऱ्या सर्व सुविधांची माहिती दिली. यावेळी उपस्थितांचे आभार प्रभा यादव यांनी मानले. या कार्यशाळेसाठी सांगोला तालुक्यातून महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
0 Comments