दुर्दैवी घटना... विद्यार्थ्याने बसमधून डोके बाहेर काढले आणि जिवावर बेतले !
धावत्या बस मधून खिडकीतून डोके बाहेर काढणे जिवावर बेतले असून एका पंधरा वर्षे वयाच्या शालेय विद्यार्थ्याचा या घटनेत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
'धावत्या बस मधून शरीराचा कोणताही अवयव बाहेर काढू नका' अशी सूचना राज्य परिवहन महामंडळाच्या बस मध्ये असते पण त्याकडेही दुर्लक्ष करून हात बाहेर काढणे, डोकावणे असे प्रकार सर्रास सुरु असतात. बस चालकाच्या बाजूने असा प्रकार घडल्यास आणि त्याला आरशात दिसल्यास चालक लगेच सूचना देत असतात.
कुठल्याही वाहनातून अचानक हात बाहेर काढणे, मागे पुढे न पाहता दरवाजा उघडणे असे प्रकार अपघाताला निमंत्रणच देत असतात. असाच प्रकार औरंगाबादमध्ये एका बसमधून घडला असून बसच्या खिडकीतून बाहेर डोकावणे भलतेच महागात पडले आहे. पंधरा वर्षे वयाच्या शाळकरी मुलाला आपले प्राण गमवावे लागले आहेत.
हरिओम राधाकृष्ण पंडित हा पंधरा वर्षे वयाचा शाळकरी मुलगा शाळा सुटल्यानंतर आपल्या घरी निघाला असताना ही हृदयद्रावक घटना घडली आहे. पहिल्या सत्राची परीक्षा सुरु असून पेपर दिल्यानंतर शाळेतून हा विद्यार्थी आपल्या घरी निघाला होता.
शहर वाहतूक बस थांब्यावरून तो आणि त्याचे काही मित्र बसमध्ये चढले. बस वळवून आणण्यासाठी म्हणून चालकाने ही बस जिल्हा परिषद मैदानाकडे नेली आणि याच दरम्यान हरिओम याने बसच्या खिडकीतून डोके बाहेर काढले. त्याने डोके बाहेर काढताच बाहेरच्या बाजूस असलेल्या एका लोखंडी फाटकावर त्याचे डोके आदळले.
धावती बस आणि लोखंडी फाटकावर डोके आदळल्याने त्याला जोरदार मार लागला. डोक्याला जबर मार लागून रक्तस्त्राव झाला आणि पंधरा वर्षे वयाच्या या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. बजाजनगर येथील मोहटादेवी भागात राहणारा हा
विद्यार्थी सरस्वती भुवन प्रशालेत नववीत शिक्षण घेत होता. त्याचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने प्रचंड हळहळ व्यक्त होत असून ही दुर्घटना अनेकांचे डोळे उघडणारी देखील ठरली आहे. धावत्या वाहनातून डोके अथवा शरीराचे अन्य अवयव बाहेर काढल्यास होणारा धोका किती मोठा असून शकतो हेच या घटनेने अधोरेखित केले आहे.
0 Comments