जेष्ठांसाठी तीन टक्के राखीव निधी; सांगोला नगरपरिषद राज्यातील पहिली नगरपरिषद
सांगोला नगरपरिषदेमार्फत जेष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करून तसेच ज्येष्ठांसाठी 'विरंगुळा केंद्राची' सुरुवात करण्यात आली.
सांगोला - सांगोला नगरपरिषदेमार्फत जेष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करून तसेच ज्येष्ठांसाठी 'विरंगुळा केंद्राची' सुरुवात करण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांसाठी नगरपालिकेच्या अर्थसंकल्पात 3 टक्के निधी राखीव ठेवणारी सांगोला नगरपरिषद राज्यातील पहिली नगरपरिषद असल्याची माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.
ज्येष्ठ नागरिक समाजाच्या जडणघडणीत दिलेल्या योगदानाचा, त्यांच्या अनुभवाचा सन्मान करण्यासाठी सांगोला नगरपरिषदेमार्फत नगरपरिषद कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांचा शाल, झाडाचं रोप देवून सन्मान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटना अध्यक्ष रामदास भोसले, राजेंद्र यादव, अरविंद केदार यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थित ज्येष्ठ नागरिकांची अजिंक्यतारा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे नष्टे डॉक्टर यांच्यामार्फत आरोग्य तपासणी देखील करण्यात आली.
ज्येष्ठ नागरिकांसाठी नगरपालिकेच्या अर्थसंकल्पात 3 टक्के निधी राखीव ठेवणारी सांगोला नगरपरिषद राज्यातील पहिली नगरपरिषद असून या 3 टक्के निधीतून नगरपरिषद मार्फत मिरज रोड पाण्याची टाकी, वासुद रोड पाण्याची टाकी या 2 ठिकाणी ज्येष्ठांसाठी "विरंगुळा केंद्र" उभारण्यात आले असून ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून या विरंगुळा केंद्रांचा उद्घाटन समारंभ पार पडला.
ज्येष्ठ दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, त्यांची आरोग्य तपासणी, विरंगुळा केंद्रांचे उद्घाटन समारंभ या सर्वांच्या आयोजनात नगरपरिषदेच्या कार्यालयीन अधीक्षक श्रीमती अभिलाषा निंबाळकर, पाणीपुरवठा अभियंता तुकाराम माने यांनी विशेष परिश्रम घेतले. योगेश गंगाधरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर अभिलाषा निंबाळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
ज्येष्ठ नागरिकांसाठी नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पात 3 टक्के निधीची तरतूद करणारी सांगोला नगरपरिषद राज्यातील पहिली नगरपरिषद झाली आहे. या निधीतून उभारलेल्या विरंगुळा केंद्रांची आज सुरुवात करण्यात आली. यापुढेही ज्येष्ठ नागरिकांसाठी नगरपरिषद मार्फत भरीव असे कार्य करण्याचा संकल्प आहे.
- कैलास केंद्रे, मुख्याधिकारी, सांगोला नगरपरिषद.


0 Comments