PMGSY अंतर्गत सुरू असलेल्या सोनलवाडी ते बलवडी पाटी या रस्त्याच्या
कामासाठी रॉयल्टी न भरता हजारो ब्रास मुरुमाचे बेकायदेशीर उत्खनन ; महसूल प्रशासनाची डोळे झाक !
सांगोला तालुका प्रतिनिधी ;- सांगोला तालुक्यातील सोनलवाडी अजनाळे बलवडी ते बलवडी पाटी या रस्त्याचे काम गेल्या काही दिवसापासून प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेअंतर्गत सुरू असून या रस्त्याच्या कामासाठी संबंधित ठेकेदार यांनी शासनाची कोणत्याही प्रकारची रॉयल्टी न भरता या रस्त्याच्या कामासाठी वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पाडून हजारो ब्रास मुरमाचे बेकायदेशीर उत्खनन केले आहे.
असे असतानाही संबंधित महसूल प्रशासन याकडे पूर्णपणे डोळे झाक करत असल्याचे निदर्शनास येत आहे. महसूल प्रशासनाच्या या गलथान कारभारामुळे रॉयल्टी पोटी शासनास मिळणाऱ्या लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.
अशाप्रकारे संबंधित ठेकेदार राजरोसपणे जेसीबी पोकलेन च्या साह्याने टिप्पर , ट्रॅक्टर च्या माध्यमातून दिवसा ढवळ्या हजारो ब्रास मुरमाची चोरी करत असतानाही संबंधित ठेकेदारावर महसूल प्रशासन कोणत्याही प्रकारची कारवाई करत नसल्यामुळे या बेकायदेशीर कामात महसूल विभागाचा हि सहभाग आहे की काय ? असा संशय निर्माण होत आहे.
अशाप्रकारे रस्त्यांची कामे करणाऱ्या ठेकेदाराकडून बेकायदेशीर मुरमाचे मोठमोठे खड्डे पाडून उत्खनन केले जाते, कामे सुरू असताना संबंधित महसूल प्रशासन या ठेकेदारावर कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही परंतु अशा रस्त्याची कामे पूर्ण झाल्यानंतर महसूल प्रशासनाला जाग येते आणि पुन्हा
बेकायदेशीर उत्खनन करून पाडलेल्या खड्ड्यांची मोजमाप घेऊन सदर उत्खनन केलेल्या जागेचे मालक शेतकरी यांना हजारो रुपये दंडाच्या नोटिसा महसूल प्रशासना कडून पाठवल्या जातात. एकीकडे महसूल प्रशासन ठेकेदाराशी हात मिळवणे करून त्यांना या बेकायदेशीर मुरूम उत्खननामध्ये मदत करते तर दुसरीकडे शेतकऱ्यांना दंडाच्या नोटिसा काढून मानसिक आर्थिक त्रास देतात.
त्यामुळे सोनलवाडी ,अजनाळे, बलवडी ते बलवडी पाटी या ठिकाणच्या प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून या ठिकाणी शासनाची रॉयल्टी न भरता हजारो ब्रास मुरमाचे बेकायदेशीर उत्खनन केले मुळे संबंधित ठेकेदारावर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.


0 Comments