बोरोटी खुनाचा छडा लागला ; या कारणास्तव करण्यात आला खून ; पाच जणांना अटक
सोलापूर : प्रेमदास श्रीमंत राठोड यांनी इसम नामे अभिषेक श्रीमंत राठोड वय २१ वर्षे राहणार झापु तांडा बोरोटी बु तालुका अक्कलकोट हा दिनांक ११ नोव्हेंबर २०२१ रोजी ११ वाजलेपासून बेपत्ता झालेला असले बाबत खबर दिली होती. अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनने बेपत्ता म्हणून दाखल केले होते.
सदर बेपत्ता इसमाचा शोध चालू असताना प्रियांका धोंडु चव्हाण हिने यातील बेपत्ता इसम अभिषेक श्रीमंत राठोड यास दिनांक ११ नोव्हेंबर २०२१ रोजी विठ्ठल मानसिंग चव्हाण याचे सोबत झापु तांड्याहुन शेताकडे जात असताना शेवटचे पाहिलेचे सांगितल्याने सर्व आरोपीं विरोधात अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशन येथे भा.द.वि. कलम ३६५, ३६८, ३४ प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक प्रदिप काळे, स.पो.नि. बाबासाहेब काकडे, पो. स. ई. सिद्राम धायगुडे, पो.हे.कॉ. अजय भोसले, पो.हे.कॉ. रफिक शेख, पो.ना. अल्ताफ शेख, पो. ना. सुभाष दासरे, पो.ना. नबिलाल मियॉवाले, पो.ना. जगदीश राठोड यांनी तपासाची चक्रे फिरवून तपास केला असता सदरचा गुन्हा हा आरोपी नामे विठ्ठल चव्हाण याची पत्नी दिव्या हिचेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून आरोपी
१) विठ्ठल मानसिंग चव्हाण, वय ३१ वर्षे, २) बहादुर मानसिंग चव्हाण वय ४२, ३) मोताबाई मानसिंग चव्हाण तिघे राहणार झापु तांडा, बोरोटी बु अक्कलकोट, ४) विकास प्रकाश राठोड वय २५ वर्षे, राहणार शहाबाद, जि. गुलबर्गा, कर्नाटक, ५) गणेश व्यंकटेश राठोड, वय १९ वर्षे राहणार तांदुळवाडी, बारामती, जि. पुणे यांनी दिनांक ११ नोव्हेंबर २०२१ रोजी यातील मयत अभिषेक श्रीमंत राठोड यास खून करण्याचे उद्देशाने अपहरण करून त्यास शेतामध्ये घेऊन गेले त्यास मारहाण करून डोक्याला, तोंडाला, चेह-यावर चिकटपट्टीने गुंडाळून जीवे ठार मारले. व पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने त्याचा मृतदेह शेताच्या शेजारील बांधाशेजारी खड्डा खोदुन पुरल्याचे तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे. सर्व आरोपींना पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर भादविक 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीसनिरीक्षक प्रदीप काळे हे करीत आहेत.


0 Comments