बारामतीसह देशातील १४४ लोकसभा मतदारसंघात भाजपचे विरोधकमुक्त मिशन..! अमित शहा मुख्य पालक..!
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या प्रयोगावर कायमचा उतारा शोधण्यासाठी भाजपने आता महासंग्रामाच्या अंतिम लढाईचा नारा दिला आहे. जिथे कधीच भाजप विजयी झाला नाही, तिथे गृहमंत्री अमित शहा यांची राजकीय लढाईची पध्दत वापरली जाणार आहे. प्रत्येक चार मतदारसंघामागे एक केंद्रीय मंत्र्याकडे जबाबदारी देण्यात आली असून त्याचा नमुना बारामती मतदारसंघात दाखवला जाणार आहे.
९ ऑगस्ट रोजी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे बारामतीत तयारीसाठी येत असून १५ ते १८ ऑगस्टदरम्यान निर्मला सितारामन हे बारामती लोकसभा मतदारसंघात मुक्काम करणार आहेत.
या मुक्कामादरम्यान त्यांच्या चहा, नाश्त्यापासून ते जेवणापर्यंत व मुक्कामापर्यंत प्रत्येक बाबींची काळजी घेतानाच त्याला राजकीय किनार कायम राहील याची दक्षता घेतली जात आहे. पुरंदर तालुक्यातील सासवड व १८ ऑगस्ट रोजी बारामतीत त्या पत्रकार परीषद घेणार आहेत. यानिमित्ताने नवे पदाधिकारी जोडण्याची भाजपची आखणी आहे. आपल्या पाठीशी अमित शहा थेट जोडलेले आहेत असा विश्वास यातून नव्या पदाधिकाऱ्यांना देण्याची योजना आखण्यात आली आहे.
दरम्यान देशात भाजपविरोध संपविण्यासाठी विरोधकांचे परंपरागत बालेकिल्ले उध्वस्त करण्यासाठी भाजपच्या शिर्षस्थ नेतृत्वाने १४४ लोकसभा मतदारसंघ निवडले आहेत. चार चार मतदारसंघांचे क्लस्टर निवडले आहेत. पुढील अठरा महिन्यांत प्रत्येक महिन्यास एक केंद्रीय मंत्री संबंधित मतदारसंघात भेट देईल व राजकीय वातावरण अधिकच तापते ठेवेल.
अर्थात त्यासाठीचा सर्व प्रोग्राम सर्वेक्षण करूनच ठरवला जाणार आहे. दरम्यान ज्या गोष्टी गुप्त ठेवून राबवायच्या, त्यांची प्रसिध्दी पध्दतशीर होईल याचीही आखणी भाजपने केली आहे. त्यामुळे पध्दतशीर बातम्या पेरून वातावरणनिर्मिती करायची व विरोधकांमध्ये अस्वस्थता निर्माण करायची हे देखील प्रचारतंत्र राबवले जात आहे.


0 Comments