सोलापूरच्या एनटीपीसीत अधिकाऱ्याला लाच घेताना सीबीआयने केली अटक ; मोठी कारवाई
सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि केंद्र शासनाच्या मालकीची असणारी जिल्ह्यातील एकमेव कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एनटीपीसीमधील यूपीएल कंपनीतील सुरक्षा अधिकाऱ्याला कंत्राटदार, पुरवठादार आणि कामगारांकडून पैसे खाण्याची गोडी लागली होती. पैसे घेतल्याशिवाय तो कामच करत नव्हता. त्यामुळे वैतागलेल्या एका कंत्राटदाराने केलेल्या तक्रारीवरून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने शनिवारी दुपारी एनटीपीसी कंपनीच्या आवारात छापा टाकून संबंधित लाचखोर अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले. त्याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
गोविंद कुमार असे सीबीआयने ताब्यात घेतलेल्या एनटीपीसीमधील अधिकाऱ्याचे नाव असून तो एनटीपीसी अंतर्गत असणाऱ्या युटिलिटी पॉवरटेक लिमिटेड नावाच्या कपनीकडे सेफ्टी ऑफिसर (सुरक्षा (अधिकारी) म्हणून कार्यरत आहे. ही कंपनी ठेकेदार नेमणे, काट देगो आदी कामे करने, या कामांची जबाबदारी गोविंद कुमार याच्याकडे होती.
तो कंत्राट देण्यासाठी, कंत्राटदारांची बिले काढण्यासाठी पैशाची मागणी करत असल्याच्या तक्रारी होत्या. त्याला वैतागून एका कंत्राटदाराने थेट सीबीआयकडे तक्रार केली होती. त्यावरून ही कारवाई करण्यात आली.
सोलापुरातील एका कंत्राटदाराने यूपीएल कंपनीकडे पाच लाख रुपये सुरक्षा ठेव (सिक्युरिटी डिपॉझिट) म्हणून ठेवले होते. ती रक्कम परत मिळवण्यासाठी त्याने कंपनीकडे रीतसर मागणी केली होती. ही रक्कम देण्यासाठी गोविंद कुमार संबंधित कंत्राटदाराकडे अडीच लाख रुपयांची मागणी करत होता. सुरुवातीला कंत्राटदाराने गोविंद कुमारला अडीच लाख रुपये देण्याचे मान्य केले होते.
दरम्यान, गोविंद कुमार यास अडीच लाख रुपये देण्याची संबंधित कंत्राटदाराची इच्छा नव्हती. म्हणून त्याने पुण्यातील सीबीआयचे कार्यालय गाठले. त्याठिकाणी रीतसर तक्रार दाखल केल्यानंतर शनिवारी एनटीपीसी परिसरात सापळा लावण्यात आला. एनटीपीसीमध्ये असलेल्या आयटीआयच्या बाहेर संबंधित कंत्राटदाराला त्याने पैसे घेऊनयेण्यास सांगितले होते. त्यानुसार शनिवारी दुपारी दीड वाजता गोविंद कुमार आयटीआयपासून बाहेर रस्त्यावर आला. त्याठिकाणी एक लाख रुपयांची रोकड स्वीकारताना सीबीआयच्या पथकाने रंगेहाथ पकडून त्याला ताब्यात घेतले.
गोविंद कुमार यास ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी करण्यासाठी त्याला पुणे महामार्गावरील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रात हलवण्यात आले आहे. त्याठिकाणी सीबीआयचे पथक रात्रीपर्यंत त्याची चौकशी करत होते. मात्र चौकशीतील कोणताही तपशील समजू शकला नाही. दरम्यान रात्री गोविंद कुमार याची रवानगी जेलरोडच्या लॉकअपमध्ये करण्यात आली.


0 Comments