पंढरपूर - सातारा मार्गावर अपघातात तीन तरुण ठार !
पंढरपूर - सातारा मार्गावर आज अत्यंत भीषण अपघात झाला असून या अपघातात तीन तरुण जागीच ठार झाले आहे तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
अलीकडच्या काळात अपघात ही नित्याची बाब झाली असून माणसांच्या जीवाची किंमत उरलेली नाही असेच दिसते. रस्ते चकाचक झाल्यापासून तर अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले असून वाहने चालाविण्यातील बिफिकीरी देखील वाढली आहे. यामुळे निरपराध व्यक्तींचेही प्राण जात आहेत तर अनेकजण आपल्या मस्तीने मृत्यूला कवटाळत आहेत.
दररोज अनेक अपघात होत आहे आणि कित्येक जीव जात आहेत तरीदेखील वाहतुकीत शिस्त येताना दिसत नाही की त्यांच्यावर कुणाचे नियंत्रण उरले असल्याचेही दिसत नाही. अशाच निष्काळजी वाहन चालविण्यामुळे पंढरपूर - सातारा मार्गावर माण तालुक्यातील गोंदवले खुर्द जवळ घोडके वस्ती येथे दुचाकी आणि कार यांच्यात झालेल्या अपघातात तीन तरुणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे तर अन्य दोघे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
बुलेट आणि स्विफ्ट कार यांच्यात अपघात होऊन आज ही दुर्घटना घडली आहे. या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला आहे. यात बुलेटवरून निघालेले तुषार लक्ष्मण खाडे (वय २२), अजित विजयकुमार खाडे (वय २३) आणि महेंद्र शंकर गौड (वय २१) हे तिघे जागीच ठार झाले आहेत. स्विफ्ट चालक गणेश आनंद ढेंबरे (वय २८) आणि त्याच्या बाजूला बसलेले आनंदराव ढेंबरे हे दोघे जण जखमी झाले आहेत. या जखमी दोघांना दहिवडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघात एवढा भयानक होता की अपघात झाल्यानंतर देखील कारने बुलेटला जवळपास तीनशे फुट फरफटत नेले तर बुलेटवरील एक जण जोराची धडक होताच उंच उडाला आणि रस्त्यावरून येणाऱ्या एका क्रुझर गाडीच्या काचेवर आदळला. यामुळे क्रुझर गाडीच्या काचेचा चुराडा झाला आहे. परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी एकच गर्दी उसळली होती.
0 Comments