धनुष्यबाण चिन्हाविषयी शहाजीबापू पाटलांनी केला मोठा दावा
सोलापूर : धनुष्यबाण चिन्हाविषयीची लढाई कायद्याने सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे, त्यामुळे मी त्यावर बोलणे बरोबर नाही. पण, सर्वसाधारणपणे बहुमताचा विचार केला तर धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळेल, असे मला वाटते, असा मोठा दावा सांगोल्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी केला आहे.
मैत्रीदिनानिमित्त बोलताना आमदार पाटील यांनी हा दावा केला आहे. ते म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे आणि शिवसेना वाढवावी. पक्ष भरभराटीला न्यावा, अशी भावना प्रत्येक शिवसैनिक, आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची आहे. भगवंतांच्या आशीवार्दाने हे घडूनही येईल.प्रभाग रचना बदलली तरी शिवसेनाच मुंबई महापलिका जिंकेल, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला
असला तरी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचेही तेच म्हणणे आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर निकाल लागेपर्यंत प्रत्येक पक्ष दावा करत असतो, त्याप्रमाणे त्यांनी केला असावा. पण, निकाल लागल्यानंतर वास्तवता कळेल, असा टोलाही आमदार पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला.दोन लोकांचं जंबो सरकार हे मुंबईत थोडं आणि दिल्लीतच जास्त असतं, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली असली तरी त्यावर मी जास्त बोलणं उचित ठरणार नाही.
पण, येत्या तीन-चार दिवसांत सर्वकाही सुरळीत होईल आणि सरकार काम करायला चालू करेल, असा दावाही त्यांनी केला. आदित्य ठाकरेंनी राज्यपालांवर केलेल्या टीकेबाबत शहाजी पाटील म्हणाले की, राज्यपालांविषयी कॉमेट करणे गैर आहे. कारण त्या त्या पदाला वेगळे महत्व आहे. पण बोलत असताना त्यांच्याकडून चुकाही झाल्या आहेत, असं मला वाटतंय. मध्यंतरी मुंबईविषयी केलेले विधान महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला खटकणारे होते. अनवधनाने हे विधान झाल्याची राज्यपालांनी कबुलीही दिली आहे. एखादा विषय राजकारणातील सर्वकाही आहे,
असे गृहीत धरून त्याच्या पाठीमागे पळत सुटल्याने जनतेचे प्रश्न सुटणार आहेत काय? जनतेचे प्रश्न आणि अडचणी वेगळे आहेत. सध्या शेतकरी ज्या संकटात सापडला आहे. त्यांना त्यातून सोडविण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज आहे.हे सरकार दोन लोकांवर चाललं आहे, हा गैरसमज आहे. पण अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेत असतात आणि मंत्रीमंडळ त्यांना सहकार्यासाठी असते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच त्यांच्या सहकाऱ्यांची निवड करतील आणि महाराष्ट्रातील सरकार दोन-चार दिवसांत मार्गी लागेल, असेही शहाजीबापूंनी स्पष्ट केले.


0 Comments