दोन माजी सरपंच आणि ग्रामसेवकावर गुन्हा दाखल !
टेंभुर्णी : जागेची परस्पर फेरफार केल्याप्रकरणी दोन माजी सरपंच आणि एक ग्रामसेवक यांच्यासह चार जणांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे खळबळ उडाली आहे.
ग्रामपंचायतींचे सरपंच हे गावकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे काम करीत असतात तर ग्रामसेवक हा कारभारावर लक्ष ठेवून असतो. सरपंच अथवा सदस्यांनी काही चुकीचे केले असेल तर त्याला रोखण्यासाठी ग्रामसेवक पुढे येत असतो पण माढा तालुक्यातील मोडनिंब येथे वेगळीच घटना समोर आली असून ग्रामसेवकासह दोन माजी सरपंच देखील गोत्यात आले आहेत.
माजी सरपंच दत्तात्रय सुर्वे, बाबुराव सुर्वे आणि तत्कालीन ग्रामसेवक महादेव देवकाते (जाधववाडी, ता. माढा) तसेच मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील शिवाजी बाबर या चार जणांच्या विरोधात बेकायदा फेरफार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे माढां तालुक्यात विशेषत: मोडनिंब परिसरात खळबळ उडाली आहे.
मोडनिंब येथील दिवंगत हनुमंत ज्ञानदेव सुर्वे यांना १९९८ मध्ये ग्रामपंचायत मालकीची मिळकत ठरावाद्वारे मंजूर करून देण्यात आली होती. त्यानंतर २००२ साली उतारा कायम करण्याचा ठराव देखील मंजूर झाला होता. हनुमंत सुर्वे यांचे २००९ मध्ये निधन झाले आणि त्यांचा मुलगा सोमनाथ सुर्वे यांची वारसाहक्काने नोंद झाली. ठरावाद्वारे सुर्वे यांना १६ X २५ एवढे क्षेत्र देण्यात आले होते पण या जागेची ८ X १० आणि ८ X १० अशी फोड केली गेली. मिळकत क्रमांक १२५३ अ अशी असताना १२५३ अ आणि १२५३ ब अशी फोड करण्यात आली.
एवढा सगळा प्रकार झाला असला तरी फोडीबाबात सुर्वे यांना काहीच कल्पना देण्यात आली नाही. त्यांना अंधारात ठेवून हा प्रकार करण्यात आला. सुगावा लागल्यावर सुर्वे यांनी याबाबत माहिती अधिकारात अर्ज करून माहिती मागितली परंतु तत्कालीन ग्रामसेवक नरहरी अरगडे यांनी माहिती उपलब्ध नसल्याचे कळवले त्यामुळे सुर्वे यांना माहिती मिळू शकली नाही. त्यानंतर धक्कादायक बाब अशी की सन २०१९ मध्ये या चौघांनी मिळून ही जागा शिवाजी बाबर यांच्या नावे केली.
गावगुंडीचा भलताच त्रास होत होता आणि त्यांची जागा पेनूर येथील शिवाजी बाबर याच्या नावाने करण्यात आली होती. अखेर त्यांनी माढा न्यायालयात दाद मागितली. एकूण प्रकरण माढा न्यायालयाच्या समोर गेल्यावर न्यायालयाने याची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीसाना दिले.
त्यानुसार पोलिसांनी माजी सरपंच बाबुराव सुर्वे, माजी सरपंच दत्तात्रय सुर्वे, ग्रामसेवक महादेव देवकाते आणि शिवाजी बाबर या चौघांच्या विरोधात टेंभुर्णी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर मोडनिंब परिसरात जोरदार चर्चा रंगू लागली आहे.


0 Comments