सोलापूर जिल्ह्यात एकाच दिवशी जाळ्यात अडकले दोन "सरकारी मासे" !
सोलापूर : जिल्ह्यात एकाच दिवशी दोन 'सरकारी मासे' लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले असून यातील एक तलाठी आहे तर दुसरा कृषी विस्तार अधिकारी आहे.
गेल्या वर्षभरात लाच घेताना पकडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. कोरोनाच्या काळात सरकारी कार्यालये बंद होती तर काही काळ मर्यादित उपस्थितीत सुरु होती. या दरम्यान देखील कार्यालये ओस पडत होती आणि जनतेची कामे खोळंबून पडली होती. ही कार्यालये सुरु होताच भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी यांनी ताळतंत्र सोडले आणि लाच मागण्याच्या आणि घेण्याचा सपाटाच लावला. महसूल. पोलीस या विभागातील अनेक छोटे आणि मोठेही मासे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकू लागले. सतत अशा कारवाया होत असतानाही सरकारी कर्मचारी, अधिकारी लाच घेण्याचे धाडस करतात आणि तुरुंगात जाऊन बसतात.
सोलापूर जिल्ह्यात एकाच दिवशी दोन 'मासे' या जाळ्यात अडकले असून दोन्ही घटना माढा तालुक्यातील आहेत. माढा पंचायत समितीचा कृषी विस्तार अधिकारी केवळ पाचशे रुपयांच्या मोहात तुरुंगात जाऊन बसला तर मोडनिंब येथील तलाठी चार हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडला गेला. जिल्हा परिषदेच्या सेस योजनेंतर्गत डीबीटी योजनेचे कडबा कुट्टी मशीन अनुदान मिळविण्यासाठी केलेल्या अर्जातील बँकेच्या खात्याच्या नंबरमध्ये दुरुस्ती करण्यासाठी पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी संदीप रामचंद्र गावडे याने एक हजाराची लाच मागितली होती. तडजोडीने पाचशे रुपये देण्याचे ठरले.
--आणि मासा अडकला !
अर्जातील दुरुस्तीसाठी देखील लाच मागण्यात आल्याने ही लाच देणे तक्रारदारास मान्य नव्हते. त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. या विभागाने सापळा लावला आणि पंचायत समिती कृषी विभागाच्या कार्यालयातच लाच घेताना विस्तार अधिकारी संदीप गावडे हा रंगेहात पकडला गेला. कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तलाठीही अडकला !
सांगोला तालुक्यातील मेडशिंगी येथे राहणारा आणि मोडनिंब येथे सेवेत असलेला तलाठी महेशकुमार मनोहर राऊत याला देखील चार हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. एका शेतकऱ्याकडे त्याने चार हजार रुपयांची लाच मागितली होती आणि ती स्वीकारताना तो लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला.
नोंदीसाठी लाच !
सात बारा उताऱ्यावर शेतातील झाडांची नोंद लावण्यासाठी गाव कामगार तलाठी महेशकुमार राऊत याने चार हजार रुपयांची मागणी केली होती. लाचेही ही रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने राऊत याला रंगेहात पकडले.
0 Comments