google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ‘या’ पद्धतीने करता येणार वारस नोंद, तलाठी कार्यालयाचे हेलपाटे वाचणार..!

Breaking News

‘या’ पद्धतीने करता येणार वारस नोंद, तलाठी कार्यालयाचे हेलपाटे वाचणार..!

 ‘या’ पद्धतीने करता येणार वारस नोंद, तलाठी कार्यालयाचे हेलपाटे वाचणार..!

आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात अनेक गोष्टी सहज, सोप्या झाल्यात. कोरोना काळात तर ऑनलाईन पद्धतीचे महत्व प्रकर्षाने दिसले. त्यात आता महसूल विभागही मागे राहिलेला नाही.. डिजिटल सात-बारा असो, वा ई-फेरफार उतारे अशा अनेक सुविधा महसूल विभागाने ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करुन दिल्या आहेत.


महसूल विभागाच्या या सुविधांमध्ये आता आणखी एकाची भर पडली आहे. मृत खातेदाराच्या वारसांची नोंद करण्यासाठी आता तलाठी कार्यालयाचे हेलपाटे मारण्याची गरज नाही. अगदी घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने नागरिकांना त्यासाठी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यासाठी महसूल विभागाने ‘ई-हक्क प्रणाली’ विकसित केलीय..


मृत व्यक्तीच्या वारसांची नोंद लावण्यासाठी नागरिकांना ‘महाभूमि’ या संकेतस्थळावर जावे लागेल. त्यावर ‘लॉग-इन’ करून ऑनलाइन अर्ज करता येईल. हा ऑनलाइन अर्ज संबंधित गावाच्या तलाठ्याकडे जाईल. तलाठ्याला त्या अर्जाची ऑनलाइन पडताळणी करुन वारसांची नोंद घ्यावी लागणार आहे.. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे.


ऑनलाईन वारस नोंदीचे फायदे


हस्तलिखित वारस नोंदवही आणि तक्रार नोंदवही बंद होणार.

तलाठी कार्यालयात न जाता ऑनलाइन अर्ज करता येणार.

फक्त जबाब नोंदण्यासाठीच तलाठी कार्यालयात जावे लागेल.

ऑनलाइन पद्धतीमुळे तलाठी स्तरावरील ‘पेंडन्सी’ कळणार.

आवश्‍यक कागदपत्रे जोडल्यानंतर 15 दिवसांत वारसाची नोंद व पुढील 15 दिवसांत फेरफार नोंदी होणार.

दरम्यान, वारस नोंदीप्रमाणेच तक्रार अर्ज, कर्ज बोजा दाखल करणे अथवा कमी करणे, अपाक (अज्ञान पालक कर्ता), एकत्र कुटुंब मॅनेजर नोंद कमी करणे, गॅझेटमधील नावानुसार बदल करणे आदी कामांसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे..


बॅंकांनाही आता ‘ई- हक्क’ प्रणाली उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे सात-बारा उताऱ्यावर कर्जाचा बोजा टाकणे अथवा कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयात जावे लागणार नाही. बॅंकांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर तलाठी कार्यालयात शेतकऱ्यांच्या कर्जाची नोंद घेतली जाणार आहे..

Post a Comment

0 Comments