शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, ठाकरे सरकार ‘हे’ बियाणे देणार मोफत…!
शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं.. मात्र, त्याचे स्वत:च्या, कुटुंबाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. ही बाब लक्षात घेऊन खरीप हंगामाच्या तोंडावर ठाकरे सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या आरोग्यासाठी पोषक गुणधर्म असणाऱ्या भाज्या, कडधान्यांचे 10 वाण राज्य सरकार शेतकऱ्यांना मोफत देणार आहे..
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. 19) राज्यातील खरीप हगांमाबाबत आढावा बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.. शेतकऱ्यांच्या आरोग्यासाठी पोषक गुणधर्म असणाऱ्या भाज्या, कडधान्यांचे 10 वाण मोफत देणारे, शेतकऱ्यांच्या आरोग्याचा विचार करणारे महाराष्ट्र हे देशातले पहिलेच राज्य असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले..
“राज्याच्या सर्वांगीण प्रगतीत कृषी क्षेत्राचे मोठे योगदान आहे. राज्य सरकारने विकासाची पंचसूत्री स्वीकारली असून, कृषी क्षेत्राला प्रथम प्राधान्य दिलंय. त्यामुळे शेतीला आधुनिकतेची जोड देतानाच, यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाने नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करावी,” असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
‘विकेल ते पिकेल’ अभियान
ते म्हणाले, की “शेतकरी सुखी, ते राज्य सुखी… शेतकरी आपल्या कुटुंबातले घटक आहेत. त्यामुळे यंत्रणेने त्यांच्यासोबत आपुलकीने काम करावे. ‘विकेल ते पिकेल’ अभियान यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे.. पिकांवरील रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासह अतिवृष्टीबाबत सतर्कता बाळगली पाहिजे. शेतमालाला हमी भाव आहे, पण हमखास भाव मिळाला पाहिजे..”
शेतकऱ्यांसमोर पीकविम्याचा प्रश्न आहे. सध्याचा पीकविमा समाधानकारक नाही. याबाबत केंद्राकडे पाठपुरावा करीत असून, केंद्र सरकारही त्यावर विचार करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले..
यंदाच्या खरीपात राज्यात 151.33 लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली अपेक्षित आहे. खरीपात खोडमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा पुरेसा पाऊस होणार आहे. परंतु पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले..


0 Comments